सुप्रिया ताईंशी दादांशी चर्चा झाली
पुणे- पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेत तुतारी अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार घड्याळ या चिन्हावर लढतील, असा दावा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीचे दोन्ही गट महापालिका निवडणुकीत एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे. दरम्यान, शरद पवार गटाच्या नेत्याने हा दावा फेटाळला आहे.
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकीनंतर आता राज्यात मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी होणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपापली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या पक्षाचे प्रदेश सरचिटणीस दत्तात्रय धनकवडे यांनी पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्याचा दावा केला आहे.
ते म्हणाले, आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र निवडणूक लढवणार आहेत. दोन्ही पक्षांचे उमेदवार ‘घड्याळ’ या चिन्हावर निवडणूक लढवतील. दोन्ही पक्षांमधील जागावाटपाचा तिढा सुटला आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल. उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर यासंदर्भात अधिक माहिती उपलब्ध होईल.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष आणि माजी महापौर प्रशांत जगताप यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्यास विरोध दर्शवला आहे. पण धनकवडे यांनी याविषयी वरिष्ठ नेते निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रीय नेते आहेत, तर खासदार सुप्रिया सुळे कार्याध्यक्ष आणि शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे हेच वरिष्ठ नेते एकत्रित बसून आघाडीबाबत अंतिम निर्णय घेतील. विशेषतः खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाली आहे. त्यानुसार, पुढील निवडणुका ‘घड्याळ’ या चिन्हावरच लढवल्या जातील, असे माजी महापौर धनकवडे म्हणाले.
दत्तात्रय धनकवडे यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. दुसरीकडे, शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी हा दावा फेटाळला आहे. ते म्हणाले, माझा पक्ष हा शरद पवारांचा आहे. आमचा पक्ष जिथे कुठे लढेल व आमचे उमेदवार जिथे कुठे उभे राहतील ते तुतारी वाजवणाऱ्या मनुष्याचे चिन्ह घेऊनच लढतील. त्यामुळे कोण कुठे काय बोलत आहे त्यावर मला काहीही भाष्य करायचे नाही. पण एक नक्की आहे की, अजित पवारांविषयी माझ्या मनात कुठेही राग, द्वेष किंवा आकस नाही.
फक्त माझे एक युनिट आहे. ते खूप छान पद्धतीने बांधले आहे. तिथे ताकदीचे उमेदवार आहेत. पुण्यात महायुतीविरोधात महाविकास आघाडी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष एक चांगला पर्याय म्हणून पाहिला जातो. हा पर्याय पुणेकरांना हवाहवासा वाटतो. त्यामुळे त्याच पर्यायाने जावे असे माझे मत होते. पण यासंदर्भात अंतिम निर्णय हे शरद पवारच घेतील, असे ते म्हणाले.
प्रशांत जगताप यांनी यावेळी अजित पवार व काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यातील फोनवरील संभाषणावरही भाष्य केले. ते म्हणाले, अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. ते राज्यातील कोणत्याही नेत्याशी सहजपणे चर्चा करू शकतात. त्यामुळे त्यांचे सतेज पाटलांशी बोलणे झाले असेल. मला त्याची कोणतीही माहिती नाही. पण महाविकास आघाडी पार्ट वेगळा व आपसातील संवाद वेगळा. पण तूर्ततरी महाविकास आघाडी म्हणूनच आमच्यात चर्चा सुरू आहे, असे ते म्हणाले.
दुसरीकडे, शरद पवार गटाच्या नेत्यांची आज शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत अजित पवारांनी महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवावी असा प्रस्ताव अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शरद पवार गटाचे उमेदवार खरेच घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार का? याविषयी साशंकता आहेत

