रिपब्लिकन पक्ष हा भाजपचा सच्चा साथीदार
पुणे :
रिपब्लिकन पक्ष हा भारतीय जनता पक्षाचा सच्चा साथीदार आणि महायुतीतील भागीदार आहे. महायुती परिपूर्ण झाली असून यापुढे त्यात भागीदार वाढवू नका, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले. पुणे महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला 12 जागा मिळाल्या अशी मागणी देखील त्यांनी केली.
पुणे महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्यावतीने आश्रम मैदान, डॉ बाबासाहेब आवेडकर महाविद्यालय, नाना पेठ, पुणे येथे ‘संकल्प मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले बोलत होते, याप्रकरणी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, शहर प्रभारी शैलेन्द्र चव्हाण, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर अशोक कांबळे, अशोक गायकवाड, महिपाल वाघमारे, महेंद्र कांबळे, अशोक शिरोळे, शाम सदाफुले, महिला शहराध्यक्ष हिमाली कांबळे, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, विशाल शेवाळे, यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते मेळाव्याकरीता उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षाच्या साथीने रिपब्लिकन पक्ष आपला विस्तार करत आहे. मी पक्षाची देशभर बांधणी करत आहे. आज ईशान्य भारतामध्ये देखील रिपब्लिकन पक्षाने स्थान मिळवले आहे. आंबेडकरी विचाराच्या पक्षांमध्ये महाराष्ट्रात मतभेद बघायला मिळतात मात्र देशात इतर ते बघायला मिळत नाही, असे आठवले यांनी नमूद केले. राहुल गांधी यांच्याकडून सातत्याने निवडणूक आयोग व सत्ताधाऱ्यांवर मत चोरीचा आरोप केला जातो. मात्र, हा आरोप निरर्थक असल्याचा जावा आठवले यांनी केला. मतदान केंद्रावर प्रत्येक उमेदवाराचे प्रतिनिधी असतात. मतदान यंत्र ठेवलेल्या ठिकाणी पोलिसांचा खडा पहाडा असतो. अशावेळी मतचोरी कशी शक्य आहे असा सवाल त्यांनी केला.
काँग्रेसला लोक आता मत देत नाहीत. कारण त्यांना मत देऊन त्याचा उपयोग नाही, हे लोकांना उमगले आहे. विरोधी पक्षांबद्दल मतदाराला आत्मीयता राहिलेली नसल्यामुळे ते सातत्याने पराभूत होत आहेत, असेही आठवले म्हणाले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, आगामी महापालिका निवडणूक महायुती म्हणून लढणार, आज नगरपरिषद, नगर पंचायत मध्ये जे यश मिळाले तसेच यश १६ जानेवारी रोजी मिळेल त्यासाठी हा मेळावा आहे. आज पहिली सभा प्रचंड मोठी आहे यातून आपल्या विजयावर शिक्कामोर्तब होणार आहे. जो सन्मान मोदीजी आणि देवेंद्रजी आठवले साहेबांना देतात तोच सन्मान आणि सत्तेत योग्य वाटा रिपब्लिकन पक्षाला मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुणेकरांच्या विश्वासाला आपण पुरे ठरलो. वाहतूक कोंडीमुक्त पुणे करण्यासाठी मोठे प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत.
यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्याचा समारोप राष्ट्रगीताने झाला.

