निवडणूक आयोगाचा गोंधळी कारभार, बोगस मतदान, पैसा व सत्तेचा निवडणुकीत प्रचंड गैरवापर.
मुंबई, दि. २१ डिसेंबर २०२५
नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाचा गलथान कारभार अधिरेखीत झाला आहे. मतदार प्रक्रियेचा पुरता गोंधळ घातला गेला, तारिख पे तारिख चा खेळ केला. ही निवडणूक फ्रि अँड फेअर अशी झाली नाही. सत्ताधारी पक्षाकडून साम, दाम, दंड, भेद या नितीचा मुक्तपणे वापर करण्यात आला. निवडणुकीत बोगस मतदार, दडपशाही, सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा प्रचंड वापर पहायला मिळाला. सत्ताधारी पक्षांच्या विजयात निवडणूक आयोगाची मदत सर्वात महत्वाची ठरली आहे, अशी प्रतिक्रीया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.
निवडणूक निकालावर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भाजपा महायुती सरकारच्या कामावर जनता प्रचंड नाराज आहे. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकळला आहे, जनतेची कामं होत नाहीत, अशा परिस्थितीत आज आलेले निकाल जनतेचा कौल वाटत नाही. लोकशाही व संविधानाची पायमल्ली करत खुलेआमपणे दडपशाही करण्यात आली. निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले बनले आहे. निवडणूक आयोगाचा गोंधळी कारभार व सत्ताधारी पक्षांचा पैसा फेक तमाशा देख, हा खेळ या निवडणुकीत पहायला मिळाला. या सर्व पार्श्वभूमीमुळे काँग्रेस पक्षाला अपेक्षित यश मिळालेले नाही. काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नसले तरी काँग्रेस पक्ष लोकशाही व संविधान रक्षणासाठी संघर्ष करत राहिल, आमची ही वैचारिक लढाई आहे असे सपकाळ म्हणाले.
नगरपालिका निवडणुकीत भाजपाला मिळालेले यश हे एकनाथ शिंदेंची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी धोक्याची घंटा आहे. शत प्रतिशत भाजपासाठी या दोन मित्रपक्षांना भाजपा बाहेरचा रस्ता दाखवेल, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

