आयुष्याविषयी ठाम भूमिकेमुळे आज मी तृप्त आहे : अमोल पालेकर
पुणे : भाग्य या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. चित्रपट, नाट्य क्षेत्रात अभिनय करताना संवेदनशीलता, भावनात्मक मोकळेपणा जपत राहिलो. कोणत्याही एका साचेबद्ध भूमिकेत न अडकता अभिनयात वैविध्य देण्याचा माझा स्वभाव, नवेपणा स्वीकारण्याची इच्छा असल्यानेच मी खलनायकी भूमिकाही साकारल्या. त्यामुळेच खलनायकी भूमिकेतही अभिनयातून सच्चेपणाच मांडत गेलो. आयुष्याच्या वाटेवर कुठे थांबायचे, कुठे बदल करायचे याविषयी माझ्या ठाम भूमिका असल्यामुळे आज मी जो आहे तो तृप्त आहे, अशा भावना सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी व्यक्त केल्या.
रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या (दि. 21) पहिल्या सत्रात अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांच्याशी उत्तरा मोने यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अमोल पालेकर यांच्या असंख्य चाहत्यांच्या प्रतिसादात ही मुलाखत रंगली.
अमोल पालेकर पुढे म्हणाले, अभिनेता म्हणून रसिकांनी मला भरभरून प्रेम दिले, तसेच प्रेम माझ्या साहित्यकृतीला मिळेल हा विश्वास मला होता. ज्यांना माझे विचार पटत नाहीत त्यांना पलटवार करण्याची संधी मिळेल असे वाटले होते; परंतु ते प्रमाण खूपच कमी असल्याने त्यांची दखल घेण्याची गरज पडली नाही. माझ्या भूमिका रसिकांना आवडल्या याचे श्रेय माझ्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना द्यावे लागेल कारण त्यांनी माझे व्यक्तिमत्व फुलविण्याची संधी दिली.
मी मुळचा मुंबईचा असलो तरी आजची मुंबई मला परकी वाटते. मुंबईत ओळखीच्या ठिकाणीजाताना आज मी गुगल मॅपच्या मदतीशिवाय पोहोचू शकत नाही. परंतु गेली 25 वर्षे पुण्यात स्थायिक असल्याने पुणे खूप बदलले नाही असे मला जाणवते. त्यामुळे पुण्यात रमलो. मी पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही, अशी टिप्पणीही अमोल पालेकर यांनी केली.
पालेकर पुढे म्हणाले, माझ्यातील चित्रकार कुठल्याही इझममध्ये किंवा ठराविक विचारात अडकलेला नाही. त्यामुळे मी चित्रातून प्रकटीकरण करताना अमूर्त शैलीचा वापर करतो. दिग्दर्शकाच्या भूमिकेत असताना माझ्यातील चित्रकार जागा असल्यामुळे मला दृश्यात्मक परिणामांवर विशेष लक्ष द्यावे असे वाटते. त्यामुळे माझ्या चित्रपटांमध्ये दृश्यात्मक बटबटीतपणा कधीच आला नाही. चित्रिकरणाचा विचार पटकथेपासूनच केला जातो. त्यामुळे प्रकाश योजना, नेपथ्य, ऋतु यांविषयी सखोल विचार करून चित्रपट निर्मिती केली जाते. लहानपणापासूनच घरामध्ये वाचन संस्कृती रुजलेली असल्यामुळे मला साहित्यविषयक गोडी लागली. यातूनच माझ्या हातून ऐवजसारखी साहित्यकृती निर्माण झाली.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी विचार ठाम : संध्या गोखले..
आपल्या घरातील नायक अशी ओळख असलेल्या अमोल पालेकर यांनी चित्रपटात नायक साकारताना समकालीन प्रसिद्ध नायकांपेक्षा वेगळेपण दर्शविल्याने ते सामान्यांचा नायक म्हणून आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झाले, असे सांगून संध्या गोखले म्हणाल्या, खऱ्या आयुष्यातही अमोल पालेकर एक शांत, समंजस, विचारी, संवेदनशील आणि सहनशील व्यक्ती आहेत. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी त्यांचे व माझे काही ठाम विचारही आहेत. त्यासाठी आम्ही सातत्याने लढा देत आहोत. पुण्यात कला क्षेत्रात पूरक वातावरण असल्यामुळे आमच्या हातून कला क्षेत्रात विविध उपक्रम घडले.

