पुणे : ‘अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या जागतिक संकटांचे मूळ कारण आहे. पृथ्वीवरील सर्व संसाधनांचा मनसोक्त उपभोग घेणे म्हणजे यश आणि आनंद ही ‘मी’पणाची प्रवृत्ती त्यासाठी कारणीभूत आहे. हवामान बदलासारख्या संकटांवर आपण भौतिक उपाय शोधत आहोत, मात्र या संकटाचे कारण मानवाच्या अंतर्मनातील ‘द्वैतवाद’ आणि अज्ञानात दडलेले आहे,’ असे परखड विवेचन प्रसिद्ध आध्यात्मिक विचारवंत आचार्य प्रशांत यांनी व्यक्त केले.
पुणे पुस्तक महोत्सवात फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अँफी थिएटरमध्ये आयोजित ‘पुणे लिट फेस्ट’मध्ये ‘फियरलेस ट्रुथ अँड द गीताज कॉल’ या सत्रात ते बोलत होते. यावेळी लेखिका व पत्रकार गार्गी रावत यांनी त्यांच्याशी संवाद साधला. महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, ‘एनबीटी’चे संचालक युवराज मलिक आदी उपस्थित होते.
‘समाजमाध्यमांतील रिल्स आणि इतरांच्या आयुष्याकडे पाहून आपण आपल्या ‘मी’पणाच्या दाव्याना खतपाणी घालतो. सोशल मीडिया हे जनरल नॉलेज किंवा जागृतीसाठी असते, असे काही लोक म्हणतात. मात्र, ही शुद्ध आत्मवंचना आहे. स्वतःला काय हवे आहे हे माहित नसताना गोळा केलेली माहिती सर्वात घातक असते. हवामान बदल हे याच अविद्येचे परिणाम आहेत. या बाह्य ज्ञानाचा फटका आज संपूर्ण पृथ्वी भोगत आहे,’ असेही त्यांनी नमूद केले.
..
प्रेम-यशाची व्याख्या
‘प्रेम ही पवित्र गोष्ट आहे, पण मानवाने त्याला भोगाची वस्तू मानून अपवित्र केले आहे. आत्मज्ञानाच्या सुगंधातून निर्माण झालेले नाते म्हणजे खरे प्रेम,’ अशी व्याख्या आचार्य प्रशांत यांनी सांगितली. ‘यशाची व्याख्या म्हणजे आपल्याला नक्की काय हवे आहे याचे आत्मज्ञान असणे. आंतरिक दुःख जाणून ते मुळापासून नष्ट करणे म्हणजे खरे यशस्वी जगणे होय. जर एखादे उद्दिष्ट प्राप्त केल्यानंतरही तुमच्यात आंतरिक बदल झाला नाही, तर त्या प्रक्रियेला काहीच अर्थ उरत नाही,’ असेही त्यांनी नमूद केले.
….

