पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते ‘अटलजी एक व्रतस्थ याज्ञिक ‘ या पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : अटलजींनी ग्रामीण भारतातील नागरिकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सरकारी योजनांचा लाभ देऊन, त्यांच्या जीवनात उन्नती आणण्याचे काम केले. या योजनांची पायाभरणी अटलजींनी करीत, विकसित भारताचे स्वप्न पाहिले होते. या योजनांना पॉलिटिक्स ऑफ डायरेक्ट अँड इनडायरेक्ट बेनेफिट्स म्हणता येईल. या स्वप्नाला नरेंद्र मोदीजी पुढे नेत २०४७ मध्ये विकसित भारताची संकल्पना मांडली असून, त्यादृष्टीने आमच्या सर्वांचे प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी शनिवारी दिली.
पुणे पुस्तक महोत्सवात मोरया प्रकाशनाने प्रकाशित केलेले आणि मेधा किरीट लिखित ‘अटलजी एक व्रतस्थ याज्ञिक’ या पुस्तकाचे प्रकाशन तावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, माजी खासदार किरीट सोमय्या, राजहंस प्रकाशनाचे शिरीष सहस्रबुद्धे, मेधा किरीट, दिलीप महाजन, डॉ. सुनील भंडगे, डॉ. श्रीपाद ढेकणे आदी उपस्थित होते. आटपाडी शिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या उपक्रमात आटपाडी परिसरातील एक लाख पुस्तकांचे वाचन ग्रामस्थांनी केले आहे.
तावडे म्हणाले, देशातील सुमारे ४० टक्के जनता घराच्या बाहेर पडत नाही, हे वास्तव आहे. या नागरिकांच्या विकासासाठी काम करावे लागणार असून, जबाबदारी घ्यावी लागेल. देशाच्या ग्रामविकासाची संकल्पना माननीय अटलबिहारी वाजपेयी यांनी मांडली होती. पंतप्रधान रस्ते योजनेमुळे ग्रामीण भागातील जनतेचा विकास झाला आहे. नागरिकांना शाळेपर्यंत जाता येते, तर रुग्णालयाt कमी वेळेत पोहोचता येते. शेतीमालाला कमी वेळेत बाजारपेठेत नेता येते. या सर्वामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनात उन्नती होत आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणजे गरिबांना मोफत धान्य, ग्रामीण भागातील नागरिकांना किसान सन्मान योजना किंवा लाडकी बहिणसारख्या योजना, महिला बचत गटांना सहकार्य, उद्योगांसाठी आर्थिक मदत करणे, अशा ग्रामीण विकासाच्या योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल होत आहे. यातूनच २०४७ मध्ये विकसित भारताची संकल्पना यशस्वी होणार आहे. याची संकल्पना अटलजींनी मांडली आणि ती यशस्वी राबविण्याचे काम नरेंद्र मोदीजी करीत आहेत, असे तावडे यांनी सांगितले. तावडे म्हणाले, पुणे पुस्तक महोत्सवाला प्रतिष्ठा मिळाली, हे यश पुणेकरांचे आहे. मराठी वाचक वाचण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांना चांगले दर्जेदार साहित्य उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. अटलजी हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर साहित्यिक, कवी, लेखक म्हणून प्रसिद्ध होते. अटलजींच्या सारख्या मोठ्या व्यक्तिमत्त्वावर पुस्तक लिहिणे ही मोठी जबाबदारी असते. ही जबाबदारी मेधा किरीट यांनी यशस्वीरीत्या पेलली आहे. या पुस्तकातून युवा पिढीला भरपूर ज्ञान मिळणार असल्याचे तावडे यांनी सांगितले. तावडे यांनी ते मुंबई भाजपचे अध्यक्ष असताना, अटल बिहारी वाजपेयी यांच्या सोबत झालेल्या भेटी आणि संवादाच्या आठवणी सांगितल्या. यावेळी संपूर्ण सभागृह अटलजींच्या आठवणीत रमले होते.
किरीट म्हणाल्या, पुस्तक दोन भागात आहे. या पुस्तकाचा पहिला भाग १९८७ मध्ये प्रकाशित झाला होता. तो ५० पानांचा होता. त्यामुळे पुढील भाग कमी पानांचा आणि तितकेच चांगले व्हायला हवा, या अपेक्षेने शिरीष सहस्रबुद्धे आणि मी काम करायला सुरुवात केली. खूप काळ गेला असला, तरी पुस्तक उत्तम झाले आहे. अटलजी आमच्यासाठी देव होते. त्यांचा सहवास आणि पाठिंबा लाभला आहे. त्यांच्या आठवणी आम्ही मौल्यवान वस्तूप्रमाणे जपून ठेवल्या आहेत. अटलजींनी आमच्यासारख्या अनेक पिढ्या घडवल्या आहेत.अशा आठवणी या पुस्तकातून वाचायला मिळेल. त्यामुळे पुस्तक वाचून झाल्यावर, प्रतिक्रिया कळवा, असे आवाहन किरीट यांनी केले.
सहस्रबुद्धे म्हणाले, अटलजींवर त्यांच्या जवळच्या व्यक्तीने पुस्तक लिहिणे ही खरचं उत्तम बाब आहे. अटलजी हे चरित्रनायक होते. त्यांच्यामुळे त्यांच्यावर पुस्तक येणे. मेधा किरीट यांनी अटलजींचा सहवास लाभला आहे. त्यामुळे हे पुस्तक सर्वांग सुंदर झाले आहे. त्यात अटलजींच्या अनेक आठवणी आहे. यातील याज्ञिक हा शब्द मला भावला आहे. जन्म, बालपण, त्यांचा जीवनपट १०० पानामध्ये लिहिणे ही फार कठीण बाब आहे. मात्र, हे शक्य करून दाखविले आहे. मराठे यांनी अटलजींच्या आठवणी सांगितल्या. राजेश पांडे यांनी प्रास्ताविक करीत, पुणे पुस्तक महोत्सवाची माहिती दिली.
पुस्तक महोत्सवही एवढ्या मोठ्या प्रमाणावर असतो ?
पुस्तक महोत्सव एवढ्या मोठ्या प्रमाणावर होऊ शकत, हे मला वाटले नाही. नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता अनेक मंत्री, खासदार यांनाही पुस्तक महोत्सवाचे आयोजन करावेसे वाटले नाही. मात्र, राजेश पांडे कोणत्याही पदावर नसतांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुस्तक महोत्सव आयोजित करू शकतात, हे इथे आल्यावर समजते. पुण्यातील साने गुरुजींच्या वारसदार जे जमले नाही, ते अमळनेर तालुक्यातील एक खेड्यातून समोर आलेल्या गोळवलकर गुरुजींच्या कार्यकर्त्याला जमले, असे कौतुक विनोद तावडे यांनी राजेश पांडे यांच्या कामाचे केले

