रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद
पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले.
रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली.
प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले
रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा
बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले.
एआयविषयी आत्मभान आवश्यक
नव्या काळातील कृत्रिम बुद्धीमत्तेसारख्या घटकांची दखल जरूर घ्यावी, पण ते घटक अस्सल, जिवंत अनुभूती देणारे ठरू शकत नाहीत, असेही दवणे म्हणाले. कुठलीही व्हिटॅमिन, प्रोटीनवाली पावडर आईच्या दुधाची बरोबरी करू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. एआय वगैरे बोलताना आत्मभान गरजेचे आहे. ताजेपण जपण्यात खरी श्रीमंती आहे. जगण्याच्या उद्दिष्टांचा चंद्र सापडला तर जगणं चांदण्याचं होतं, असे सांगून प्रा. दवणे यांनी
कविता नंतर फुलते
आधी आपण फुलून यावे लागते
गाणे नंतर फुलते
आधी आपण गाणे म्हणावे लागते
निळी रात्र वितळते
केशरपहाट उजळते
हिरव्यागार पानावर
दवात सोने मिसळते…
अश्या काव्यपंक्ती ऐकवून संवादाचा समारोप केला.
संमेलनात दि. 21 रोजी होणारे कार्यक्रम : सकाळी 9:50 – शिववंदना. सकाळी 10 – अमोल पालेकर, संध्या गोखले यांची मुलाखत. संवादक उत्तरा मोने. दुपारी 12 – परिसंवाद – ‘डावे की उजवे विचारांच्या चक्रव्यूहातील आम्ही’, अध्यक्ष – डॉ. अश्विनी धोंगडे, सहभाग – अविनाश धर्माधिकारी, डॉ. गीताली वि. म., डॉ. विश्वंभर चौधरी, अभिजित जोग, ॲड. असिम सरोदे. 2:30 – गो. नी. दांडेकर यांच्या साहित्यावर आधारित ‘कोऽहम्’ सांस्कृतिक कार्यक्रम. सहभाग – मृणाल कुलकर्णी, शिवराज वायचळ, शिवानी रांगोळे. सायंकाळी 4:15 – परिसंवाद – ‘माध्यमांची भाषा आणि साहित्यभान’, अध्यक्ष – विजय कुवळेकर, सहभाग – विजय बाविस्कर (लोकमत), शीतल पवार (सकाळ), श्रीधर लोणी (महाराष्ट्र टाइम्स), सिद्धार्थ केळकर (लोकसत्ता), सुनील माळी (पुढारी). 5:30 – शरद पोंक्षे यांचा व्होकेशनल एक्सलन्स ॲवॉर्डने सन्मान. हस्ते – संभाजी भिडे गुरुजी. प्रमुख उपस्थिती – प्रसाद गणपुले. 5:45 – संभाजी भिडे गुरुजी यांची मुलाखत, संवादक – शरद पोंक्षे. 6:30 समारोप समारंभ उपस्थिती – प्रवीण दवणे, संभाजी भिडे गुरुजी, शरद पोंक्षे, संतोष मराठे, शुभ्रो सेन.

