ठाणे |पुणे- संपूर्ण हयात ज्या परिवाराने कॉंग्रेस मध्ये घालविली, ७ वेळा महापालिका निवडणूक लढवून कॉंग्रेसचे नगरसेवक म्हणून तब्बल ३५ वर्षे काम केले अशा माजी स्थायी समिती अध्यक्ष,माजी उपमहापौर पदी काम केलेले मात्र आता कॉंग्रेसमधून निलंबित केलेले ज्येष्ठ नेते आबा बागुल यांनी आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आबा बागुल यांनी या प्रवेशाबाबत एवढी गोपनीयत का बाळगली हे कोडे मात्र अनेकांना समजू शकलेले नाही. त्यांच्या पत्नी जयश्री बागुल यांच्यासह त्यांचे पुत्र काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अमित बागुल,काँग्रेस युवा शहर चिटणीस कपिल बागुल, पुणे शहर काँग्रेसचे सचिव अभिषेक बागुल, माजी सरचिटणीस हेमंत बागुल,दीपक गावडे, घनश्याम सावंत,विलास रत्नपारखी, जयवंत जगताप आदी कार्यकर्त्यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

काँग्रेस पक्षाला लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत जो धक्का दिला आहे त्यातून हा पक्ष अद्याप सावरलेला नाही. सच्चा कार्यकर्त्याला या पक्षात किंमत राहिलेली नाही, त्यामुळेच अनेकांनी शिवसेना आणि भाजपची वाट धरली आहे. आबा बागुल यांनी कायम सर्वसामान्य माणसासाठी काम केले आहे. त्याच भावनेतून ते यापुढेही कार्यरत राहतील असा विश्वास याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त व्यक्त केला.
यावेळी पुणे जिल्हाप्रमुख रमेश बापू कोंडे, ठामपा माजी नगरसेवक राजेश मोरे, ठामपा माजी नगरसेवक संजय सोनार तसेच पुण्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

