‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास म्हणून पाहणे आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हे
पुणे, दि. १९ डिसेंबर २०२५ :
फर्ग्युसन महाविद्यालय येथे सुरू असलेल्या पुस्तक महोत्सवात आज उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भेट देऊन मनोविकास प्रकाशन निर्मित आणि श्रीमंत माने लिखित ‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे प्रकाशन केले. या प्रसंगी बोलताना त्यांनी आणीबाणीच्या काळाकडे केवळ राजकीय वादाच्या चौकटीत न पाहता, निरपेक्ष इतिहास आणि सामाजिक दस्तऐवज म्हणून पाहणे अधिक योग्य ठरेल, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाला जेष्ठ पत्रकार विजय बाविस्कर, लेखक श्रीमंत माने, मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर, आणि सकाळ प्रकाशनचे माधव गोखले यांसारखे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, विधान परिषदेमध्ये आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या व्यक्तींना अनुदान द्यावे की नाही, याबाबत झालेल्या चर्चेची आपण स्वतः साक्षीदार आहोत. त्या काळात कायदा अस्तित्वात असताना आणि नंतर तो रद्द करतानाही आपण सभागृहात उपस्थित होतो. महाराष्ट्रात पुढील काळात आंदोलनांची पार्श्वभूमी असताना राज्य पातळीवर ‘आणीबाणी सदृश’ कायदा लागू करण्याच्या चर्चाही झाल्या, त्या वेळी आपण त्याबाबत प्रश्न उपस्थित केल्याचे त्यांनी सांगितले.
आणीबाणी ही देशपातळीवर लागू होते, राज्य पातळीवर नाही; मात्र काही वेळा सुरक्षा कायद्यांच्या माध्यमातून तत्सम परिस्थिती निर्माण होऊ शकते. या पुस्तकाच्या निमित्ताने आजच्या काळातील सुरक्षा कायदे, लोकशाही मूल्ये आणि राज्यकर्त्यांची जबाबदारी यावर सखोल चिंतन होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
या पुस्तकात उल्लेख असलेल्या ४४व्या घटनादुरुस्तीने भविष्यात कोणालाही सहजपणे आणीबाणी लागू करता येऊ नये, यासाठी तरतुदी करण्यात आल्या. त्यामुळे हे पुस्तक केवळ ऐतिहासिक नोंद नसून, समाज आणि राज्यकर्त्यांसाठी दिशादर्शक ठरणारे वाङ्मय आहे, असे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.


