पुणे पुस्तक महोत्सवाला सात लाख नागरिकांनी भेट दिली – राजेश पांडे
पुणे : पुणे पुस्तक महोत्सवाला पुणेकरांचा उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत सुमारे सात लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी भेट दिली आहे. वाचनसंस्कृती जपणाऱ्या पुणे शहरात हा महोत्सव खऱ्या अर्थाने ज्ञानोत्सव ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आता हा महोत्सव शनिवार, २० डिसेंबर आणि रविवार, २१ डिसेंबर असे केवळ दोनच दिवस सुरू राहणार आहे.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाच्या शुक्रवारी नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत गर्दी करत विविध विषयांवरील पुस्तकांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. साहित्य, कादंबऱ्या, कविता, बालसाहित्य, शैक्षणिक पुस्तके, स्पर्धा परीक्षांची पुस्तके तसेच वैचारिक आणि संशोधनपर ग्रंथ यांना वाचकांचा विशेष प्रतिसाद मिळत आहे. अनेक नामांकित प्रकाशकांनी दिलेल्या आकर्षक सवलतींमुळे पुस्तकप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
पुस्तक खरेदीबरोबरच महोत्सवात आयोजित करण्यात आलेले सांस्कृतिक व साहित्यिक कार्यक्रम हेही नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. लेखक–वाचक संवाद, कवी संमेलन, चर्चासत्रे, पुस्तक प्रकाशन सोहळे तसेच विविध कला-सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे महोत्सवाला वैचारिक आणि सांस्कृतिक समृद्धी लाभली आहे. या कार्यक्रमांना तरुण, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच कुटुंबांसह आलेल्या वाचकांची मोठी उपस्थिती आहे.एकूणच पुणे पुस्तक महोत्सव हा केवळ पुस्तक खरेदीपुरता मर्यादित न राहता, वाचन, विचार आणि संस्कृती यांचा संगम ठरत असून, अखेरच्या दोन दिवसांतही मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होतील, अशी अपेक्षा पांडे यांनी व्यक्त केली.
पुणे पुस्तक महोत्सवाने यंदा गर्दीचा उच्चांक गाठला असून, वाचकांकडून पुस्तकांची मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहे. पुणे पुस्तक महोत्सवाचे आता केवळ दोनच दिवस शिल्लक आहेत. अधिकाधिक पुणेकरांनी या संधीचा लाभ घ्यावा, सवलतीच्या दरात दर्जेदार पुस्तके खरेदी करावीत आणि विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घ्यावा.- राजेश पांडे, मुख्य संयोजक, पुणे पुस्तक महोत्सव
पुणे लिट फेस्टमध्ये आज एस. जयशंकर, रिकी केज
पुणे लिट फेस्टमध्ये केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे आज शनिवारी २० डिसेंबरला फ्रॉम डिप्लोमसी टू डीस्कोर्स या विषयावर दुपारी ३.३० वाजता विचार मांडणार आहेत. त्यांच्याशी राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे संचालक युवराज मलिक संवाद साधतील. त्याचप्रमाणे ‘ फ्रॉम ग्रॅमी गोल्ड टू ग्रीन अर्थ : रिकी केज लाईव्ह ‘ या विषयावर स्वतः रिकी केज दुपारी १२ ते १ या वेळेत आपले विचार मांडतील. त्यांच्याशी प्रियांशी शर्मा संवाद साधतील. या दोन्ही कार्यक्रमांना पुणेकरांनी हजेरी लावावी, असे आवाहन राजेश पांडे यांनी केले आहे.
रिकी केज यांच्याशी रंगणार संवाद
संगीत क्षेत्रातील प्रतिष्ठेचा ‘ग्रॅमी’ पुरस्कार तीन वेळा पटकावणारे एकमेव भारतीय संगीतकार आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित रिकी केज यांच्याशी संवाद साधण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. पुणे पुस्तक महोत्सवात फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये आयोजित ‘पुणे लिट फेस्ट’च्या व्यासपीठावर आज (शनिवारी) दुपारी १२ वाजता रिकी केज ‘फ्रॉम ग्रॅमी गोल्ड टू ग्रीन अर्थ’ या सत्रात संगीत क्षेत्रातील प्रवास, पर्यावरण आणि मानवतेप्रति बांधिलकी या विषयांवर आपले विचार मांडणार आहेत.


