पुणे-केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार भीमराव तापकीर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक किशोर उर्फ बाळा धनकवडे उद्या मुंबईत जाऊन भाजपात प्रवेश करणार आहेत.आमदार भीमराव तापकीर यांच्या विधानसभा मतदार संघात गेल्या महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३७ धनकवडी,कात्रज डेअरी येथून राष्ट्रवादीचे ३ नगरसेवक निवडून आले होते आणि भाजपच्या केवळ वर्षा तापकीर विजयी झाल्या होत्या.राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विजयी झालेल्यात बाळासाहेब धनकवडे,विशाल तांबे,आणि अश्विनी भागवत यांचा समावेश होता.यावेळी राष्ट्रवादीचे २ तुकडे झाल्याने यातील विशाल तांबे,बाळासाहेब धनकवडे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत राहणे पसंत केले होते तर अश्विनी भागवत या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत सहभागी झाल्या.गेल्या ५ वर्षातील महापालिकेच्या कामाचा विरोधी पक्षातील नगरसेवक म्हणून आलेला अनुभव आणि त्यानंतर प्रशासकीय काळात माजी नगरसेवक म्हणून आलेला अनुभव.प्रभाग पद्धती मधील कामकाजाचा प्रभाव,या साऱ्या गोष्टींचा अनुभव आणि अभ्यास करून आपण राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतल्याचे बाळासाहेब धनकवडे यांनी सांगितले. प्रभागातील महत्वपूर्ण विकास कामे व्हायची असतील तर भाजपचीच कास धरावी लागेल,मुख्यमंत्री फडणवीस,आमदार भीमराव तापकीर आणि पुण्याचे भाजपा नेते मुरलीधर मोहोळ आणि गणेश बिडकर यांच्या प्रभावी नेतृवाची साथ धरावी लागेल याची जाणीव झाल्याने आपण भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे धनकवडे यांनी म्हटले आहे. भाजपात कोणी आपल्या विकास कामांना अडथळे आणणार नाही तर उलट साथ देऊन प्रभागाचा नागरिकांना सुसह्य असा कायापालट करतील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

धनकवडे यांच्या निर्णयाने बारामती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना धक्का बसणार असल्याचे मानले जाते. धनकवडे यांनी लोकसभा निवडणुकीत सुळे यांना चांगले मताधिक्य मिळवून देण्यासाठी परिश्रम घेतले होते आणि धनकवडे यांना मानणाऱ्या मतदारांनी मोठी साथ दिली होती.दुसरीकडे यामुळे भीमराव तापकीर यांचीही धनकवडे यांच्या प्रवेशाने ताकद वाढणार आहे. बाळासाहेब धनकवडे यांना उद्या मुंबईतील नरीमन पाॅईंट येथील भाजपच्या मुख्यालयात होणाऱ्या समारंभातून अधिकृतपणे भाजपा प्रवेश दिला जाणार आहे.


