पुणे, ता. ८ : ‘सक्षम युवा घडवण्याचे आपल्या पंतप्रधानांचे स्वप्न विद्यार्थी साहाय्यक समिती पूर्ण करत आहे,’ असा गौरवपूर्ण उल्लेख रॉश कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजशेखर जमालमडका यांनी केला. समितीच्या कार्यात योगदान देण्याची ही सुरवात असून, आगामी काळात आणखी चांगले योगदान देऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विद्यार्थी साहाय्यक समितीच्या पी. डी. कारखानीस वसतिगृहात रॉश कंपनीच्या सामाजिक दायित्व योजनेतून (CSR) उभारलेल्या संगणक कक्ष व अभ्यासिकेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. तसेच पर्सिस्टंट फाउंडेशनच्या देणगीतून नूतनीकरण करण्यात आलेल्या पाच खोल्यांचे उद्घाटन पर्सिस्टंट फाउंडेशनच्या अध्यक्षा सोनाली देशपांडे यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी रॉश कंपनीचे कर्मचारी व पदाधिकारी, समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, विश्वस्त संजय अमृते, रत्नाकर मते, डॉ. ज्योती गोगटे, मनोज गायकवाड, कार्यकर्ते प्रदीप मांडके, स्नेहा फडके, सुप्रिया केळवकर, मुख्य विकास अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी, मुख्य कार्यपालन अधिकारी दुर्गेश पवार, पर्सिस्टंट फाउंडेशनच्या योगिता आपटे, वैभव निकम, इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी उपस्थित होते.

