पुणे- प्रौढांची एव्हरग्रीन चषक दुसऱ्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील ४० वर्षावरील गटात टीम टॉस अकादमी (अ) यांनी तर साठ वर्षावरील गटात टीम सनीज यांनी विजेतेपद मिळविले. ही स्पर्धा पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटना व महाराष्ट्र राज्य प्रौढ टेबल टेनिस समिती यांच्या संयुक्त मान्यतेने आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील ४० वर्षावरील गटात टीम टॉस अकादमी (अ) संघाने अंतिम सामन्यात डेक्कन जिमखाना (अ) संघाचा ३-० असा दणदणीत पराभव केला.

त्यावेळी विजयी संघाकडून संतोष वाकराडकर यांनी अमित ढेकणे यांचा ११-४,८-११,११-९,११-७ असा पराभव केला आणि आपल्या संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. पाठोपाठ संतोष यांचे सहकारी ओंकार जोग यांनी सुयश कुंटे यांना ११-८,११-७,११-९ असे पराभूत करीत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. एकेरीच्या तिसऱ्या लढतीत कृपाल देशपांडे यांनी आदित्य गर्दे यांच्यावर मात करीत टीम टॉस अकादमीला विजेतेपद मिळवून दिले. शेवटची ही लढत देशपांडे यांनी ११-८, ११-९,५-११,७-११,११-९ अशा अटीतटीच्या झुंजीनंतर जिंकली.

टीम सनीज यांनी ६० वर्षावरील गटाच्या अंतिम सामन्यात टीम नागपूर ऑरेंज संघाला ३-१ असे हरविले. त्यावेळी सनीज संघाच्या कपिल कुमार यांना एकेरीच्या पहिल्या लढतीत डॉ. अशोक कळंबे यांच्याकडून ३-११,११-१३,११-९, ११-१३ असा पराभव पत्करावा लागला. मात्र सनीज संघाच्या सुनील बाब्रस या आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी चमकदार खेळ करीत नागपूरच्या प्रदीप गुप्ता यांच्यावर ११-५,११-७,११-४ असा सफाईदार विजय मिळवला आणि १-१ अशी बरोबरी साधली. पाठोपाठ बाब्रस यांनी कपिल कुमार यांच्या साथीत प्रफुल्ल वाघ व अशोक कळंबे यांच्यावर ११-७,९-११, ११-८,११-४ अशी मात केली आणि आपल्या संघास २-१ अशी आघाडी मिळवून दिली. एकेरीच्या परतीच्या लढतीत कपिल कुमार यांनी प्रदीप गुप्ता यांना ११-४,११-२,६-११,११-७ असे पराभूत करीत संघाच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

