सोनीपतमधील शेतकरी महिलांनी प्रियंका गांधींच्या घरी गांधी कुटुंबांसोबत भेट घेतल्याचा व्हिडिओ राहुल गांधींनी शुक्रवारी शेअर केला. या व्हिडिओत सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि राहुल गांधींनी या महिलांसोबत संवाद साधत त्यांच्यासोबत जेवणही केले. यावेळी एका शेतकरी महिलेने सोनिया गांधींना राहुल यांच्या लग्नाबद्दल विचारणा केली असता सोनिया त्यांना तुम्ही मुलगी बघा असे म्हणाल्या. यानंतर सर्वजण हसायला लागतात. या भेटीचा अकरा मिनिटांचा व्हिडिओ राहुल गांधींच्या यूट्युब चॅनलवर अपलोड करण्यात आला आहे.
राहुल यांनी ट्विटरवर व्हिडिओचा छोटा भाग शेअर करताना लिहिले आहे, ‘आई, प्रियंका आणि माझ्यासाठी एक संस्मरणीय दिवस काही खास पाहुण्यांसोबत. सोनीपतच्या शेतकरी बहिणींचे दिल्ली दर्शन, त्यांच्यासोबत जेवण आणि खूप मजेशीर गप्पागोष्टी. सोबत मिळालेल्या अनमोल भेटवस्तू- देशी तूप, गोड लस्सी, घरचे लोणचे आणि खूप प्रेम.’
राहुल गांधींनी अलिकडेच हरियाणातून जात असताना या शेतकरी महिलांची भेट घेत त्यांच्यासोबत शेतात भात लावणीही केली होती आणि तेव्हाच त्यांच्यासोबत जेवताना त्यांनी या महिलांना त्यांच्या घरी जेवणाचे निमंत्रण दिले होते.
राहुल गांधी 8 जुलै रोजी मदिना गावात आले होते. यादरम्यान एका महिलेने बोलताना आम्हाला दिल्ली दाखवा, तुमचे घर दाखवा असे म्हटले होते. यानंतर राहुल यांनी प्रियंका गांधींना फोन लावला होता. यानंतर प्रियंका गांधींनी या महिलांना घरी येण्याचे निमंत्रण दिले होते. या निमंत्रणावरून सुमारे 43 महिला 14 जुलै रोजी त्यांच्या घरी आल्या.
यावेळी महिलांनी सोनियांसोबत नृत्यही केले. काँग्रेस नेत्या रुचिरा चतुर्वेदींनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात या महिला सोनियांचा हात धरून त्यांच्यासोबत नृत्य करताना दिसत आहेत.
पाटणा येथे विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत आरजेडीचे राष्ट्रीय अध्यक्ष लालू यादव यांनी राहुल गांधींना म्हटले, महात्माजी आता लग्न करा. दाढी वाढवून कुठे फिरत आहात? आमचे ऐका, निदान लग्न तरी करा. तुमची आई सांगायची, तो माझे ऐकत नाही, तुम्ही त्याचे लग्न लावून द्या.
अजून वेळ गेलेली नाही. लग्न करा, आम्ही वरातीत येऊ. तुमचे वय कुठे गेले? तुम्ही दाढी वाढवली आहे, आता ती कापून घ्या. हे नितीशजींचे मत आहे, दाढी लहान करा, असेही लालू म्हणाले

