पुणे, दि. २८: महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजनांच्या लाभासाठी https://www.msobcfdc.org किंवा https://msobcfdc.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महामंडळाकडून इतर मागासवर्गीय प्रवर्गांतील व्यक्तींसाठी २० टक्के बीज भांडवल कर्ज, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा, गट कर्ज व्याज परतावा, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा, महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा, कौशल्य विकास प्रशिक्षण योजना तसेच थेट कर्ज व्याज परतावा (एक लाख रुपयांपर्यंत) अशा विविध योजना राबविण्यात येतात.
२०२३-२०२४ आर्थिक वर्षासाठी पुणे जिल्ह्यात २० टक्के बीज भांडवल कर्ज ४७ लाभार्थ्यांना (एकूण २७ लाख ६५ हजार रुपये), वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ १२२ लाभार्थ्यांना (एकूण उद्दिष्ट १ कोटी ३५ लाख ६६ हजार रुपये) , गट कर्ज व्याज परताव्याचा १३ लाभार्थ्यांना (एकूण ७० लाख ८५ हजार रुपये), शैक्षणिक कर्ज व्याज परताव्याचा १२ लाभार्थ्यांना (एकूण १८ लाख रुपये) व महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजनेचा १४ हजार ४४४ लाभार्थ्यांना (एकूण १ कोटी ९५ लाख रुपये) लाभ देण्याचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या योजनांसाठी बँकेकडून कर्ज वितरीत करण्यात येत असून महामंडळाकडून १२ टक्क्यापर्यंत व्याज परतावा रक्कम दिली जाते.
कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेचा ३३३ लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. तर थेट कर्ज व्याज परतावा (१ लाख रुपयांपर्यंत) योजनेचा १२० लाभार्थ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट असून या योजनेसाठी संपूर्ण कर्ज महामंडळाकडून वितरीत केले जाते. याप्रमाणे एकूण १५ हजार ९१ लाभार्थ्यांना एकूण ६ कोटी २३ लाख १६ हजार रुपये इतका आर्थिक लाभ या योजनांच्या माध्यमातून देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
योजनांच्या अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इमारत क्र. बी, स.नं. १०४/१०५, मेंटल हॉस्पिटल कॉर्नर, पोलीस चौकी समोर, विश्रांतवाडी, येरवडा पुणे येथे समक्ष किंवा कार्यालयाचा दूरध्वनी ०२०-२९५२३०५९ किंवा dmobcpune@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहनही महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.
0000

