पुणे– शहरातील आणि उपनगरातील कोलमडून पडलेली वाहतूक व्यवस्था रस्तोरस्ती अगदी गरीबांपासून श्रीमंतानी केलेली अतिक्रमणे यामुळे शहर बकाल होत असताना अतिक्रमणांवर आणि बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यास जाणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर दादागिरी करण्याच्या प्रकारात गेल्या वर्षभरात मोठी वाढ झाली असून कारवाई पेक्षा चिरीमिरी घ्या आणि नुमुतपणे निघा असा प्रघात सर्वमान्यता पाऊ लागला आहे.यामुळे कोणीही वाली न उरल्याने प्रामाणिकपणे काम करणाऱ्या वर्गाची मोठी कुचंबना महापालिकेत होत असल्याचे दिसून येते आहे . दरम्यान काल अतिक्रमण कारवाई साठी गेलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ,मारहाण ,धक्काबुक्की आणि धमक्या दिल्याच्या कारणावरून चंदननगर आणि मुंढव्यात गुन्हे दाखल झाले आहेत .
चंदननगर पोलीस ठाण्यात भादविक ३५३,३३२,३५२, ३२४, ३२३, १४३, १४७, १४९, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल झाला असून महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने तकरार केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकार्याचे नाव गुप्त ठेवण्याचा प्रकार देखील पोलिसांनी केल्याने याप्रकारची तीव्रता लक्षात येते आहे.
मात्र पोलिसांनी सांगितले कि ,’स्विट इंडीया चौक, खराडी येथील फुटपाथवरील एक भाजी विक्रेता व इतर त्याचे पाच साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे (अटक नाही) दिनांक २५/७/२०२३ रोजी संध्याकाळी साडेसह वाजता हा प्रकार घडला .
यातील फिर्यादी हे पुणे महानगरपालीका अतिक्रमण विभागामार्फत त्यांचे सहकारी अतिक्रमण निरिक्षक व इतर स्टाफ या पथकासह नमुद ठिकाणी सार्वजनिक रोडचे कडेला फुटपाथवर कारवाई करीत असताना, सदर ठिकाणी फुटपाथवर असलेले भाजी विक्रेते हे फिर्यादी यांचे अंगावर धावुन येवुन, त्यातील एका विक्रेता याने त्यांची भाजी सार्वजनीक रोडवर विस्कटुन फिर्यादी सोबत वाद घालुन, त्याचे सोबत असलेले इतर भाजीविक्रेते याने फिर्यादीस धक्का-बुक्की करून, त्यांना अपशब्द वापरून, लाकडी फळी व लोखंडी खोरे दाडयांसहीत घेवुन फिर्यादी यांचे अंगावर मारण्यासाठी धावुन आले. तसेच फिर्यादी यांचे सहकारी याचे पाठीत लाकडी फळी मारून, हाताने मारहाण केली. तसेच तुम्ही अतिक्रमणवाले परत पुन्हा याठिकाणी आले तर, तुम्हा सर्वांना बघुन घेतो अशी धमकी देवुन, फिर्यादी हे करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला असे पोलिसांनी सांगितले .
पोलीस उपनिरीक्षक घोडके ७५८८१७००८०हे याप्रकरणी तपास करत आहेत.
तर कोंढवा पोलीस ठाण्यात एका महापालिका अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार भादविक ३५३,३२३, ५०४, ५०६ नुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथे हि तक्रारदार अधिकारी यांचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे. दि. २५/०७/२०२३ रोजी संध्याकाळी ५ वाजता कोंढवा परिसरात भिमनगर येथील मनीष पार्क गेट नं. ०२, कोंढवा बुद्रुक येथे हा प्रकार घडला
पोलिसांनी सांगितले कि,’यातील फिर्यादी हे पुणे महानगरपालिकेमध्ये सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक या पदावर आहेत. फिर्यादी हे कोंढवा परिसरात भिमनगर येथील मनीष पार्क गेट नं ०२, कोंढवा बुद्रुक, पुणे येथे हडपसर मुंढवा क्षेत्रिय कार्यालयाकडील मनपा अतिक्रमण विभागामार्फत कारवाई करीत असताना, यातील नमुद इसमांनी पोलिस स्टाफ व फिर्यादी यांचे अन्य सहकारी यांना अतिक्रमण हटविण्यापासुन मज्जाव करुन, अपशब्द वापरून, त्यांना धक्का-बुक्की करुन, फिर्यादी हे करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भाबड ९८५०२९९७७६ हे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

