मुंबई-नोटीसीद्वारे आयोगाने अजित पवार यांच्या नेतृत्वातील बंडखोर गटाने गत 30 जून रोजी दाखल केलेल्या याचिकेवर आपली बाजू स्पष्ट करण्याचे निर्देश दिलेत. या दोन्ही गटांनी आपलाच गट खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या नोटीसीद्वारे या गटांतील नेतृत्वाचे राजकारण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.
मागील वर्षभरात महाराष्ट्रातील राजकारणात अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत. अजित पवार यांनी छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आदी ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या मदतीने राष्ट्रवादीत बंडखोरी केली. त्यानंतर त्यांनी थेट शिंदे – फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीवरही दावा सांगितला. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला नोटीस बजावली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाला नोटीस बजावली आहे. या नोटीसीद्वारे अजित पवार यांच्या गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आपली भूमिका स्पष्ट करण्याची सूचना करण्यात आली आहे.अजित पवार यांनी 30 जून रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे एक याचिका दाखल केली होती. या याचिकेद्वारे त्यांनी आपणच पक्षाचे प्रमुख आहोत, त्यामुळे पक्षाचे नाव व चिन्ह आपल्याला देण्यात यावे, अशी मागणी केली होती. अजित पवार यांच्या या याचिकेवर आता शरद पवार गटाला आपली भूमिका स्पष्ट करावी लागले. यासाठी शरद पवार गटाला काही अवधी देण्यात आला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस कुणाचा? यावर औपचारिक सुनावणी सुरू होईल.

