राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांच्या ट्वीटर वर अरविंद केजरीवाल आणि राघव चड्ढा यांचा फोटो शेअर केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी माझ्या नवी दिल्लीतील निवासस्थानी सौजन्य भेट घेतली, असे पवार म्हणाले आहेत.दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्यांवर नियंत्रण ठेवण्याशी संबंधित अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाची काल मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर आता केंद्र लवकरच हा अध्यादेश सभागृहात मांडणार आहे. आम आदमी पार्टी (आप) या विधेयकाला सभागृहात विरोध करणार असून ‘आप’ला या प्रकरणात विरोधी पक्षांचाही पाठिंबा आहे. यादरम्यान का अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली आहे.
केंद्र सरकारने १९ मे रोजी अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी एक अध्यादेश जारी केला. या अध्यादेशात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा ११ मेचा निर्णय रद्द केला, ज्यामध्ये दिल्ली सरकारला बदली-पोस्टिंगचा अधिकार मिळाला होता. केंद्र सरकारने अध्यादेशाद्वारे दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या-पोस्टिंगचे अधिकार उपराज्यपालांना दिले होते.
याविरोधात दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी १७ जुलै रोजी सांगितले की, आम्ही हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवू इच्छितो. मग घटनापीठ ठरवेल की केंद्र अशी सुधारणा करू शकते की नाही? असे म्हटले होते.
दरम्यान राज्यसभेत आम आदमी पक्षासह विरोधी पक्ष विधेयकाला विरोध करणार आहे. विधेयक मंजूर होऊ नये याच्यासाठी राज्यसभेत विधेयकाला विरोध करावा यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अनेक विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. त्यांनी मुंबईत येऊन शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची देखील भेट घेतली होती.
दिल्ली सरकार विरोधातील अध्यादेशाला केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर लवकरच हे विधेयक संसदेत मांडलं जाणार आहे. या पार्श्वभूमिवर अरविंद केजरीवाल शरद पवारांच्या भेटीला पोहचल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

