मुंबई-अधिवेशनात सुरू असलेल्या चर्चेच्या दरम्यान, निधीवाटपावरून विरोधकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चांगलेच धारेवर धरले. तर दुजाभाव केला जात असल्याचा आरोप करत विरोधकांकडून सभागृहात गोंधळ घालण्यात आला. आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या की, आम्हाला सावत्र वागणूक दिली जात आहे. निधीवाटपात सावत्र वागणूक का देता? असा सवाल त्यांनी अजित पवार यांना विचारला. तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मी अजिबात सावत्र वागणूक देत नाही. यशोमती ताई तुम्ही चष्मा बदला, मी तुम्हाला भावाच्या नात्याने ओवाळणी देईल, असे म्हणत उत्तर दिले. त्यानंतर देखील सभागृहातील गोंधळ काही थांबला नाही.
कॉंग्रेस आमदारांकडून जोरदार विरोध केला गेला. त्यावर अजित पवार म्हणाले की, वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, नाना पटोले यांचे काही मतं असू शकता. कारण ते देखील चार ते पाच लाख लोकांचे प्रतिनिधीत्व करत आहेत. हे बोलत असताना पुन्हा विरोधकांडून सभागृहात जोरदार विरोध करत घोषणाबाजी केली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांना देखील विरोधक बोलू देत नव्हते. त्यामुळे सभागृहात चांगलेच वातारवण तापलेले पाहायला मिळाले. त्यानंतर विरोधकांकडून सभागृहाचा त्याग करण्यात आला.
अजित पवार म्हणाले की, साधारण सभागृहाच्या भावना मुख्यमंत्र्यांना माहित असतात. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जी भूमिका मांडली त्यावर सकारात्मक भूमिका घेतली जाईल. सन 2023 -2024 या मधील 41,243 कोटी 20 लाख एकत्रित मागणी पुरवणी मागणीला मंजुरी द्यावी, अशी अजित पवार यांनी केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विविध नियमांचे वाचन करून अधिनियमांचा उल्लेख करत मागण्यांना मंजुरी दिली.
निधीवाटप, आम्ही काय पाप केले : नाना पटोले
निधीवाटप करताना सुरू असलेला दुजाभाव किती धक्कादायक आहे. आम्ही लोकप्रतिनिधी नाही का, आमच्यावर दुजाभाव का केला जातो, आम्ही काही पापं केले आहे का, असा सवाल करत कॉंग्रेसनेते नाना पटोले आक्रमक झाले. त्यानंतर त्यांनी सभागृहाचा त्याग केला. त्यांच्यासोबत कॉंग्रेस नेते देखील उपस्थित होते.

