मुंबई, दि. २४ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील बांदिवडे बुद्रूक या ग्रामपंचायतीमधील तत्कालीन ग्रामसेवक यांनी सन २०२०-२१ व २१-२२ या वर्षात १९ लाख २३ हजार व ग्रामपंचायत बांदिवडे खुर्द कोहळे या ठिकाणी सन २०१८-१९ व सन २०१९-२० या वर्षात ११ लाख ३७ हजार असा जवळपास ३० लाख ५१ हजार रुपयांचा आर्थिक अपहार केल्याचे चौकशीत आढळून आले आहे. याबाबत त्यांच्यावर विभागीय चौकशी सुरू आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील बांदिवडे बुद्रूक या ग्रामपंचायतमधील ग्रामसेवकाने केलेले अपहार प्रकरणी विधानसभा सदस्य वैभव नाईक, भास्कर जाधव यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री. श्री. महाजन म्हणाले, सन २०१७ ते डिसेंबर २०२२ या कालावधीची पुनर्लेखा तपासणी करण्याबाबत ग्रामस्थ यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदने सादर केली आहेत. या प्रकारणांची विभागीय चौकशी सुरू असून चौकशी अहवालाच्या शिफारशीनुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे मंत्री महाजन यांनी यावेळी सांगितले.

