मुंबई–
मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे महापालिकेतील कार्यालय 24 तासांत खाली केले नाही, तर मुंबईकर आपला संताप दाखवतील, असा निर्वाणीचा इशारा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला आहे. पालकमंत्र्यांना महापालिकेत कशासाठी दालन हवे? त्यांचा महापालिकेशी काय संबंध? असे विविध प्रश्न त्यांनी यासंबंधी उपस्थित केलेत.
आदित्य ठाकरे याप्रकरणी म्हणाले की, आम्ही मंत्री असताना महापालिकेत बैठका घेतल्या. पण कोणतेही दालन हडपले नाही. हे थांबले पाहिजे किंवा मंत्रालयत सर्वच शहरांच्या महापौरांना दालन दिले पाहिजे. मला मुंबईचा आमदार म्हणून महापालिकेत केबिन दिली पाहिजे.
प्रशासनाने पालिकेतील नगरसेवकांची कार्यालये बंद केली. पण आता हे मंत्री महापालिकेत घुसखोरी करून दादागिरी करत आहेत. त्यांचा हुकूमशाही चालवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे 24 तासात थांबले नाही. केबिन खाली केली नाही, तर कधी ना कधी तरी मुंबईकर आपला राग व्यक्त करतील. त्याला जबाबदार कोण असेल हे मला माहीत नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.यावेळी त्यांनी विधानसभेत विरोधकांची मुस्कटदाबी सुरू असल्याचाही आरोप केला. ते म्हणाले की, आम्हाला मणिपूरच्या मुद्यावर बोलू दिले नाही. ज्या महिलांची नग्न धिंड काढली त्यातील एक महिला कारगिलमध्ये लढलेल्या जवानाची पत्नी आहे. तिच्यावर असा अत्याचार होत असेल तर कुठे गेली तुमची देशभक्ती? कुठे गेले तुमचे देशप्रेम? तुम्ही महिला असणे गरजेचं नाही. तुम्ही कुणाचा तरी भाऊ, बहीण व आई असणे गरजेचे नाही. या देशातील नागरिक म्हणून असे कुणासोबत घडले तर तुम्हाला राग आलाच पाहिजे. संताप आलाच पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.

