– हवामान विभागाने जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असल्याने (शुक्रवार व शनिवारी रेड अलर्ट आणि पुढील ३ दिवस ऑरेंज अलर्ट) जेजुरी येथे २३ जुलै रोजी होणारा ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. जिल्ह्याच्या घाट क्षेत्रातील पावसाची स्थिती आणि पुढील काही दिवसाचा हवामान अंदाज लक्षात घेता लाभार्थ्यांना कार्यक्रम स्थळापर्यंत येण्यास कोणताही त्रास होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री जनकल्याण कक्षातर्फे कळविण्यात आले आहे.

मुंबईसह महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस पडतो आहे. आता मुंबई , ठाणे, रायगड आणि रत्निगिरीला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यात पावसाची जोरदार हजेरी आहे. अशात आता पालघरसाठी आयएमडीने रेड अलर्ट दिला आहे.
हवामान खात्याने नागरिकांना खबरदारी बाळगण्याचा इशारा दिला आहे. धोक्याच्या ठिकाणी जाणं टाळा आणि सुरक्षित स्थळी पोहोचा, असं हवामान विभागाने सांगितलं आहे. हवामान खात्याचा इशारा पाहता खबरदारी घेत मुंबईतील काही ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना लवकर घरी सोडण्यात आलं आहे. पुढील तीन ते चार दिवस मुंबई आणि राज्यासह देशभरातही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
किंग्ज सर्कल, सायन सर्कल, चुनाभट्टी, मालाड, घाटकोपर येथे पाणी साचले आहे. यामुळे रस्ते वाहतूक मंदावली आहे. मुंबईची लाइफ लाइन असणाऱ्या लोकल सेवेलाही या पावसाचा फटका बसला आहे. हार्बर लाइनवरील लोकल सेवा अंशतः बंद झाली आहे. विशेषतः हार्बर रेल्वेच्या कुर्ला स्थानकात पाणी साचल्यामुळे वडाळा ते मानखुर्द लोकल सेवा बंद झाली आहे. मानखुर्द ते पनवेल सेवा सुरू आहे. मध्य व पश्चिम रेल्वेची लोकल सेवा सध्या सुरळीत सुरू आहे. यात मध्य रेल्वेची वाहतूक काही मिनिटे उशीराने सुरू आहे.
अंधेरी सबवे बंद
मरिन ड्राईव्ह, वांद्रे, मुंलुंड, भांडुप, अंधेरी या भागांतही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली आहे. एवढेच नाही तर कार्यालयात असलेल्या कर्मचाऱ्यांची घरी जाण्यासाठी धाकधूक वाढली आहे. अंधेरीत मागील तासभरापासून पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पावसाचा जोर कमी झाला की लगेचच यातून पाण्याचा उपसा केला जात आहे. हा मार्ग लवकरच मोकळा करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत.
उपनगरांतही तुफान पाऊस
दुसरीकडे, मुंबई उपनगरांतही तुफान पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेला आहे. या ठिकाणी 2 ते 3 फुट पाणी साचले आहे. त्यामुळे सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पावसामुळे पश्चिम द्रूतगती महामार्गावरील वाहतूकही मंदावली आहे. बोरीवलीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती आहे.

