
कुपवाड (सांगली)–
मुंबईच्या टी एस टी संघाच्या सागर कस्तुरे याने पुण्याच्या आदित्य जोरी याच्यावर मात करीत मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील १९ वर्षाखालील मुलांच्या गटात विजेतेपद पटकाविले. मुलींमध्ये टी एस टी संघाच्या संपदा भिवंडीकर हिला विजेतेपद मिळाले.
सूरज फाउंडेशन व सांगली जिल्हा टेबल टेनिस संघटना यांच्या वतीने कृष्णा व्हॅली स्कूल कुपवाड येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने होत आहे.
मुलांच्या अंतिम फेरीत सागर याने आदित्य याचा ११-३,१३-११,११-५,१२-१० असा पराभव केला. त्याने काउंटर ॲटॅक पद्धतीचा सुरेख खेळ केला तसेच त्याने परतीच्या फटक्यांवर चांगले नियंत्रण ठेवले होते. आदित्य याने सागर याला दुसऱ्या व चौथ्या गेम मध्ये चिवट लढत दिली तथापि त्याचे प्रयत्न अपुरे ठरले. उपांत्य फेरीत सागर याने द्वितीय मानांकित कुशल चोपडा या नाशिकच्या खेळाडूवर ३-१ असा अनपेक्षित विजय मिळविला होता. उपांत्य फेरीत आदित्य याने टी एस टी संघाच्या अक्षत जैन याचे आव्हान ३-१ असे परतविले होते.
मुलींच्या अंतिम सामन्यात अग्रमानांकित खेळाडू संपदा हिने आपली सहकारी दिव्यांशी भौमिक हिला ११-६,११-९, ११-८,११-३ असे चार गेम्स मध्ये पराभूत केले. तिने टॉप स्पिन फटक्यांचा बहारदार खेळ केला. उपांत्य फेरीत तिने हार्दी पटेल हिचा ३-० असा दणदणीत पराभव केला होता. उपांत्य फेरीच्या अन्य लढतीत भौमिक हिने सहाव्या मानांकित मिताली पुरकर हिच्यावर ३-० असा आश्चर्यजनक विजय नोंदविला होता.

