मुंबई-
इरशाळवाडीतील दरड कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिवसभर घटनास्थळी डेरा टाकला होता. त्यांनी जातीने सर्व मदतकार्यावर नजर ठेवली. पीडितांची आस्थावाईकपणे चौकशी केली. एवढेच नाही तर ते स्वतः डोंगर चढून इरशाळवाडीत पोहोचले. त्यांनी शुक्रवारी विधानसभेत डोंगर चढण्याचा हा अनुभव कथन केला. त्यात त्यांनी स्वतःची झालेली दमछाक नमूद करत एवढ्या प्रतिकूल स्थितीत घटनास्थळी मदतसामग्री घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना सलाम ठोकला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहाला म्हणाले, घटनास्थळी सर्वप्रथम पोहोचणाऱ्या गिरीश महाजन व आमदार महेश बालदी यांचे कौतुक. कारण, इरशाळवाडी गाव प्रचंड उंचीवर होते. गावाकडे जाणारा रस्ता चढताना एका पॉईंटला मलाही या गोष्टीची जाणीव झाली. मी पहाटे इरशाळवाडी गावाच्या पायथ्याशी पोहोचलो. रात्रभर मी गिरीश महाजन यांच्या संपर्कात होतो.
गावाकडे जाणारा रस्ता अत्यंत अवघढ व चढणीचा
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, आपण गेल्यामुळे यंत्रणा हलते, अलर्ट होते. पण इर्शाळवाडी गावाकडे जाणारा रस्ता अत्यंत अवघड व चढणीचा आहे. तिकडे जाण्याची इच्छा असल्यामुळे मी डोंगर चढण्यास सुरुवात केली. पण एका स्टेजला जाऊन मलाही हे गाव किती उंचीवर आहे आणि रस्ता किती चढणीचा आहे याची जाणीव झाली. तेथील परिस्थिती भयंकर होती. मी रस्ता चढताना विचार केला की, जी लोकं वरती साहित्य घेऊन जात आहेत, त्यांना सलामच केला पाहिजे. कारण हा रस्ता चढणे अत्यंत कठीण होते.
नातेवाईकांचा आक्रोश पाहण्याचे धाडस होत नव्हते
घटनास्थळावरील मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश पाहण्याचे धाडस होत नव्हते. हा अत्यंत दुर्दैवी प्रसंग होता. आपल्याकडे सर्व यंत्रणा असूनही त्या वापरु शकलो नाही, याची खंत वाटते. पण आपण वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे, असे एकनाथ शिंदे यांनी आपल्या निवेदनात म्हटले.
विद्यार्थ्यांनी दिली घटनेची माहिती
इरशाळवाडी गावावर दरड कोसळली तेव्हा आश्रमशाळेतील काही विद्यार्थी खेळत होते. त्यांना आवाज आला आणि ते त्या दिशेने पळाले. त्यानंतर त्यांनी इतर लोकांना या घटनेची माहिती दिली. गावातील काही जण मासेमारीसाठी, काही जण भात शेतीसाठी बाहेर गेले होते. आणखी काही जण बाहेर असण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले.
अत्यंत विदारक दृश्य होते
मुख्यमंत्री म्हणाले, आतापर्यंत 20 मृतदेह हाती लागलेत. मी मृतांच्या नातेवाईकांना भेटलो. त्यांचा आक्रोश सुरु होता. संपूर्ण परिस्थिती खूप अडचणीची होती. मातीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढलेल्या मृतदेहांची विल्हेवाट लावणे जिकिरीचे काम होते. एकीकडे एनडीआरएफचे जवान ढिगारा उपसण्याचे काम करत होते. तर दुसऱ्या बाजुला मृतांच्या नातेवाईकांशी बोलून अंत्यविधी करण्याचे ठरत होते. त्यासाठी काही जण वरतीच खड्डे खोदत होते. हे दृश्य अत्यंत विदारक होते.
सिडकोमार्फत नवी घरे बांधून देणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील पीडितांचे पुनर्वसन करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. आगामी काळात इरशाळवाडीतील गावकऱ्यांसाठी जागा निश्चित झाल्यानंतर सिडकोमार्फत तत्काळ घरे बांधून देण्यात येतील. जागा मिळाल्यानंतर लगेच कामाला सुरुवात करावी, अशा सूचना सिडकोला देण्यात आल्या आहेत, असेही शिंदे यांनी सांगितले. तूर्त इरशाळवाडीच्या खालच्या भागात पायथ्याला उभ्या कंटेनर्समध्ये 47 कुटुंबांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी 60 कंटेनर्स येणार आहेत त्यापैकी 30 कंटेनर्स पोहोचलेत.

