कुपवाड (सांगली)-ठाण्याच्या दीपित पाटील व श्रृती अमृते यांनी अनुक्रमे पुरुष व महिला गटात अजिंक्यपद पटकावले आणि राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील वरिष्ठ गटात ठाणेकरांचे वर्चस्व राखले.
सूरज फाउंडेशन व सांगली जिल्हा टेबल टेनिस संघटना यांच्या वतीने कृष्णा व्हॅली स्कूल कुपवाड येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने होत आहे. पुरुषांच्या अंतिम सामन्यात पाटील या चौथ्या मानांकित खेळाडूने द्वितीय मानांकित खेळाडू चिन्मय सोमय्या (टी एस टी मुंबई) याचा सरळ चार गेम्स मध्ये पराभव केला. टॉप स्पिनचे सुरेख फटके व चॉप्स असा अष्टपैलू खेळ करीत त्याने हा सामना ११-८,११-९,११-६,११-९ असा जिंकला. उपांत्य फेरीत त्याने मंदार हर्डीकर याचे आव्हान ४-१ अशा गेम्सने परतविले होते. उपांत्य फेरीच्या अन्य लढतीत सोमय्या याने सिद्धांत देशपांडे याचा ४-२ अशा गेम्सने पराभव केला होता.
महिलांच्या एकेरीत श्रृती हिला अंतिम फेरीत पृथा वर्टीकर या पुण्याच्या खेळाडूने शेवटपर्यंत चुरशीची लढत दिली. अतिशय उत्कंठापूर्ण झालेला हा सामना श्रृती हिने ७-११,११-५,११-७,९-११,१२-१०,११-८ असा जिंकला. दोन्ही खेळाडूंनी अतिशय अव्वल दर्जाचा खेळ केला. मात्र शेवटच्या गेममध्ये श्रृती हिने खेळावर नियंत्रण ठेवीत विजेतेपद खेचून आणले. चौथ्या मानांकित श्रृती हिने उपांत्य फेरीत श्रेया देशपांडे हिला ४-३ असे पराभूत केले होते. श्रेया हिने उपांत्यपूर्व फेरीत अग्रमानांकित समृद्धी कुलकर्णी हिला पराभवाचा धक्का दिला होता तथापि श्रृती हिच्या शानदार खेळापुढे तिचे आव्हान टिकले नाही. पृथा हिने उपांत्य फेरीत आपली सहकारी स्वप्नाली नरळे हिच्यावर ४-० असा सफाईदार विजय मिळवला होता. त्याआधी तिने उपांत्यपूर्व फेरीत द्वितीय मानांकित सेनहोरा डिसूझा हिच्यावर सनसनाटी विजय मिळविला होता.
राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा : वरिष्ठ गटात ठाणेकरांचेच वर्चस्व,दीपित पाटील व श्रृती अमृते अजिंक्य
Date:

