महाबळेश्वर -कोकणात व सह्याद्रीच्या घाटात महाबळेश्वर येथे जोरदार पाऊस सुरू असल्याने आंबेनळी घाटात पुन्हा एकदा दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे. मंगळवारी रात्री उशिरा या घाटात दरड कोसळली आहे.सकाळी काही वेळापूर्वी याच घाटात पुन्हा एकदा दरड कोसळली आहे. दरम्यान, हा कोसळलेला भाग रस्त्यावरून हटवण्यात वेळ लागणार असून तोवर वाहतूक बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी उपल्बध नसेल.
पर्यटनच्या दृष्टीने हा घाट अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यंदा पावसाळा सुरू झाल्यानंतर या घाटात अनेकदा दरड कोसळण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. हा घाट अलीकडेच वाहतुकीसाठी पूर्णपणे बंदही ठेवण्यात आला होता. त्यामुळे या घाटातून प्रवाशांनी, पर्यटकांनी वाहतूक करू नये यासाठी हा घाट पूर्णपणे सध्या बंद ठेवण्यात आला आहे.हा घाट पावसाळ्यात वाहतुकीसाठी पूर्णपणे तीन महिने बंद ठेवावा, अशा स्वरूपाचा प्रस्ताव महाड प्रशासनाकडून रायगड जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आला आहे. मात्र जिल्हा प्रशासनाकडून आंबेनळी घाटाबाबत कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. सह्याद्री खोऱ्यात तसेच रायगड आणि रत्नागिरी येथे मुसळधार पाऊस सुरू आहे. महाड पोलादपूर रस्ताही पाण्याखाली गेला आहे. त्यानंतर रायगड जिल्हा प्रशासनाकडून नियंत्रित पद्धतीने हलक्या प्रवासी वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा मोठी दरड कोसळल्याने घाटाच्या सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

