२६२ पानी उत्तरात ठाकरे गटाचा युक्तिवाद, आम्हीच शिवसेना
मुंबई-शिंदे- ठाकरे गटाच्या प्रतोदांनी परस्परविरोधी गटातील आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. त्यावर अजूनही निर्णय झालेला नाही. विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटांना नोटिसा पाठवून लेखी उत्तर मागवले होते. त्यापैकी ठाकरे गटाच्या १४ आमदारांनी मंगळवारी २६२ पानी लेखी उत्तर सादर केले आहे.
शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्तीच सुप्रीम कोर्टाने अवैध ठरवली आहेे, त्यामुळे त्यांचा व्हीप आम्हाला लागूच होत नाही. त्यामुळे कारवाईचा प्रश्नच येत नाही, असा युक्तिवाद पत्राद्वारे करण्यात आला. उलट आम्हीच खरी शिवसेना आहोत, त्यामुळे शिंदेंसह १६ आमदारांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी विधानसभा अध्यक्षांच्या नोटिसीला उत्तर दिल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रतेचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार विधानसभा अध्यक्षांना दिले. मात्र २ महिन्यात अध्यक्षांनी कारवाई केली नव्हती. ठाकरे गट न्यायालयात गेल्यावर आतापर्यंत काय कारवाई केली याची माहिती २ आठवड्यांत सादर करण्याचे निर्देश कोर्टाने अध्यक्षांना दिले होते.
ठाकरे गटाचे म्हणणे आहे की, ३ जुलै २०२२ रोजी शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी उद्धव यांच्याविरोधात बंड करणाऱ्या एकनाथ शिंदे, भरत गोगावलेंसह १६ आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती.
या मागणीनंतर शिंदे गटाने ४ जुलै २०२२ रोजी भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती केली. हा निर्णय गुवाहाटीत घेण्यात आला. त्याला ३४ आमदारांचे समर्थन असल्याचा दावा. पण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत, आम्ही आम्ही १४ जण हेच खरी शिवसेना आहोत.
नवीन प्रतोदाची गुवाहाटीत बसून निवड करणाऱ्यांपैकी काही आमदारांवर आधीच शिवसेना पक्षाने अपात्रतेची कारवाई करण्यासाठी पत्र दिले होते.
विशेष म्हणजे ११ मे २०२३ च्या सत्तासंघर्षाच्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने प्रतोद ठरवण्याचे अधिकार पक्षप्रमुखांना असल्याचे स्पष्ट आहे. शिंदे हे काही तेव्हा पक्षाचे प्रमुख नव्हते, त्यामुळे गोगावले यांची नियुक्तीच बेकायदा ठरते. ज्यांची निवडच बेकायदा आहे त्या गोगावलेंच्या मागणीवरून ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही.
शिंदे गटाच्या ४० आमदारांनाही अध्यक्षांनी नोटीस पाठवली होती. त्यांची भूमिका अद्याप समोर आली नाही. यापूर्वीच शिंदे सेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी बाजू मांडण्यासाठी मुदत वाढवून मागितली. अध्यक्ष नार्वेकर यांनीही मुदतवाढ देण्यास आपण सकारात्मक असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आता शिंदे गट कधी व काय बाजू मांडतो याकडे लक्ष लागले आहे.

