मध्य प्रदेशातील देशविघातक कृत्यांत सहभागाचा संशय
पुणे- पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री नाकेबंदीदरम्यान दोन संशयित ३० ते ३५ वयोगटातील तरुणांना वाहन चोरी करताना पकडले आहे, परंतु त्यांचा एक साथीदार पसार झाला आहे. मात्र, संबंधित आरोपींकडे घर झडतीत मिळून आलेल्या लॅपटॉप मध्ये देशविरोधी महत्त्वपूर्ण माहिती मिळून आल्याने यासंदर्भात सदर दोघांची सखोल चौकशी सुरू आहे.
मंगळवारी दिवसभर दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) कडून संबंधित आरोपींची चौकशी करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी रात्री कोथरूड पोलिस ठाण्यात पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दाखल होत संबंधित गुन्हेगारांची चौकशी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री पोलिसांचा नाइट राउंड सुरू असताना, कोथरूड परिसरात दोन गाडी चोरताना दोन आरोपी मिळून आले तर त्यांचा तिसरा साथीदार पळून गेला आहे.त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता ते मूळचे मध्य प्रदेशचे रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहेत. पोलिसांनी संबंधित व्यक्तीची कोंढव्यात भाड्याने राहत असलेल्या घरी जाऊन तपासणी केली असता, पोलिसांना आरोपींच्या घरात काडतुसे आणि लॅपटॉप मिळून आलेला आहे. संबंधित लॅपटॉपमध्ये काही इस्लामिक लिटरेचर पोलिसांना मिळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
लॅपटॅापमध्ये देशविघातक कृत्यांसंदर्भात काही माहिती पोलिसांच्या हाती लागल्याने खळबळ उडाली आहे. त्यानुसार सदर आरोपींचा नेमका कट काय होता, त्यांना कोणी पाठवले, त्यांचे अन्य साथीदार कोण आहेत, याबाबत तपास यंत्रणांकडून सखोल चौकशी केली जात आहे. नाकाबंदीदरम्यान दोघा संशयितांचा तिसरा साथीदार पळून गेला असून त्याचा शोध सुरू आहे. मध्य प्रदेशातील काही देशविघातक कृत्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचा संशय आहे, असे सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले.

