बेंगलोर –
बंगळुरूमध्ये विरोधी पक्षांच्या ऐक्याच्या दुसऱ्या दिवशीची बैठक संपन्न झाली. या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी विरोधी आघाडीला इंडिया असे नाव देण्यात आल्याचे सांगितले. या नावाचा फुल फॉर्मही त्यांनी सांगितला. त्यांच्यानुसार याचा फुल फॉर्म “इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स” असा आहे.
2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला हरवण्यासाठी 26 विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे नंतरच्या पत्रकार परिषदेत म्हणाले- समन्वयासाठी 11 सदस्यांची एक समिती आणि एक कार्यालय लवकरच स्थापित केले जाईल. मुंबईत होणाऱ्या पुढील बैठकीत याची घोषणा केली जाईल असे खरगे म्हणाले.
भाजपने ईडी, सीबीआयसारख्या लोकशाही संस्था नष्ट केल्या आहेत. आमच्यात राजकीय मतभेद आहेत. मात्र आम्ही देश वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. यापूर्वी आम्ही पाटण्यात भेटलो होतो. तिथे 16 पक्ष उपस्थित होते. आजच्या बैठकीत 26 पक्ष सहभागी झाले आहेत. हे पाहून एनडीए 36 पक्षांसोबत बैठक घेत आहेत. मला माहिती नाही ते पक्ष कोणते आहेत. ते नोंदणीकृत आहेतही की नाहीत.
सर्व मीडियावर मोदींचा कब्जा आहे. असे आधी कुठेही बघितले गेले नाही की मीडिया आमच्या विरोधात इतकी शत्रूतापूर्ण झाला. आज आम्ही स्वतःच्या हितासाठी नव्हे तर देश वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. सरकारचे अपयश सर्वांसमोर आणणे हे आमचे ध्येय आहे. राहुल, ममतांसह सर्व सहमत असल्यावर मी आनंदी आहे. 2024 ला आम्ही एकत्र लढू आणि चांगले निकाल आणू.
आघाडीचे नेतृत्व कोण करेल, चेहरा कुणाचा असेल या प्रश्नाच्या उत्तरात खरगे म्हणाले- आम्ही समन्वय समिती बनवत आहोत. मुंबईच्या बैठकीत ही 11 नावे ठरतील. पुढील माहिती तेव्हाच मिळेल.
लढा एनडीए आणि इंडिया यांच्यात
राहुल गांधी म्हणाले आज देशाचा आवाज दाबला जात आहे. इंडिया हे नाव यामुळेच निवडण्यात आले, कारण लढा एनडीए आणि इंडिया यांच्यात आहे. मोदी आणि इंडिया यांच्यात आहे. कुणी इंडियाविरोधात उभा राहिल्यास तो कसा जिंकेल तुम्हाला माहिती आहे. भारताच्या विचारांवर हल्ला होत आहे. भाजप हा हल्ला करत आहे. बेरोजगारी वाढत आहे आणि मोदींच्या जवळ असलेल्या अब्जाधीशांना फायदा होत आहे.
देशात द्वेष पसरवला
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले 9 वर्षांत केंद्राने प्रत्येक क्षेत्र उध्वस्त केले आहे. यांनी विमानतळ, जहाज, आकाश, जमीन, पाताळ सर्व काही विकले आहे. या सरकारवर शेतकरी, व्यापारी प्रत्येक घटक असमाधानी आहे. देशात द्वेष पसरवला जात आहे, त्यापासून देशाला वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.
जातीय ऐक्य धोक्यात आणले
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या देशात दलित, हिंदू, मुस्लीम प्रत्येकाचे जीवन धोक्यात आहे. दिल्ली, बंगाल, मणिपूर असो, सरकारांची खरेदी-विक्री हेच त्यांचे काम आहे. आमच्या आघाडीचे नाव इंडिया आहे. बीजेपी तुम्ही इंडियाला चॅलेंज करणार का?
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “आजची बैठक चांगली झाली. आजपासून खरं आव्हान सुरू झालं आहे. आमच्या २६ पक्षांच्या बैठकीत आघाडीला INDIA नाव देण्याचं ठरलं आहे. तुम्ही आधी युपीए नाव ऐकलं. एनडीए आताही आहे. पण प्रत्यक्षात हे अस्तित्वात नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात अनेकांचं जीवन धोक्यात आहे. अल्पसंख्याक, बहुसंख्याक, मुस्लिम, शीख, ईसाई, दिल्ली, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, बंगाल, महाराष्ट्र सर्वच धोक्यात आहेत. सरकार विकणं आणि सरकार खरेदी करणं हेच सरकारचं काम आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी खरं आव्हान स्वीकारलं आहे”, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.आम्ही आमच्या देशावर प्रम करतो. देशप्रेमींवर आम्ही प्रेम करतो. आम्ही विद्यार्थी, शेतकरी, दलित, अर्थव्यवस्थेसाठी काम करतो. आम्ही देशासाठी आणि जगासाठी आहोत. यापुढे सर्व कार्यक्रम, जाहिरात इंडिया या बॅनर अंतर्गत होणार. जर तुम्हाला आव्हान द्यायचंय तर द्या”, असा एल्गारही ममता बॅनर्जी यांनी पुकारला.“आपत्कालीन घटनेपासून देशाला वाचवा. देशातील जनतेला वाचवा. आम्हाला इंडियाला वाचवायचं आहे, आम्हाला देशाला वाचवायचं आहे. भाजपा देश विकण्यासाठी सौदागिरी करतंय. लोकशाहीला खरेदी करण्याची सौदागिरी सुरू आहे. स्वतंत्र्य यंत्रणांनाही काम करू देत नाहीत”, असंही ममता बॅनर्जी म्हणाले.

