बेंगलोर – जनता आता भाजपच्या हुकूमशाहीविरोधात एकटवू लागली आहे. यापूर्वी देशात स्वातंत्र्यलढा झाला. आतादेखील देशातील स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. त्यामुळे देशातील विरोधी पक्ष एकत्र येऊन लढा देतील. या आघाडीला इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लूझिव्ह अलायन्स अर्थात INDIA असे नाव देण्यात आले आहे. आम्ही भाजपविरोधातील लढाईत नक्की यशस्वी होऊ, असे वक्तव्य ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ते मंगळवारी बंगळुरुत आयोजित करण्यात आलेल्या विरोधकांच्या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी उद्धव ठाकरे यांनी बंगळुरुतील विरोधकांची आजची बैठक यशस्वी ठरल्याचा दावा केला. आम्ही वेगळ्या विचारधारेचे लोक एकत्र कसे येणार, असा प्रश्न विचारला जातो. पण राजकारणात वेगळ्या विचारधारा असल्या पाहिजेत. यालाच तर लोकशाही म्हणतात. हा फक्त आमच्या पक्षाचा प्रश्न नाही. काहींना वाटतं की, आम्ही कुटुंबासाठी लढत आहोत. होय, हा देश आमचं कुटुंब आहे, आमची लढाई ही देशातील हुकूमशाहीविरोधात आहे. देशातील स्वातंत्र्य धोक्यात आल्याने आम्ही लढत आहत. ही लढाई एखादा पक्ष किंवा व्यक्तीविरोधात नाही तर निती आणि हुकूमशाहीविरोधात आहे. एक व्यक्ती किंवा एक पक्ष हा देश होऊ शकत नाही. या लढाईत आम्ही नक्की यशस्वी होऊ, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. सध्याच्या वातावरणामुळे देशातील जनता घाबरली आहे. मात्र, मी त्यांना विश्वास देऊ इच्छितो की, ‘तुम्ही घाबरु नका, आम्ही आहोत’, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मोदींच्या NDA विरोधात INDIA उभी ठाकली; उद्धव ठाकरेंचा एल्गार, म्हणाले, ‘घाबरु नका, आम्ही आहोत!’
Date:

