मुंबई-‘तुमच्या अन् माझ्या वाटा आता वेगळ्या आहेत. आजपर्यंत ज्या भाजपविरोधात आपण लढलो त्यांच्यासोबत मी कधीही जाऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हीच सांगा काय मार्ग काय काढायचा?’ असा प्रतिप्रश्न काल खुद्द शरद पवार यांनी अजित पवार आणि समर्थक आमदार यांना केल्याची माहिती एका आमदाराने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी बंडखोर २० ते २५ आमदारांसह शरद पवारांना भेटले. ‘आमचा निर्णय मान्य करा अन् पुढचे मार्गदर्शन करा,’ असे साकडे या आमदारांनी ‘विठ्ठला’ला (पवारांना) घातले. रविवारीही दादांसह ९ मंत्र्यांनी व खासदार प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांनी अशीच विनंती केली होती. तेव्हा पवारांनीही प्रतिक्रिया दिली नव्हती. सोमवारी मात्र त्यांनी आमदारांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. ‘तुमच्या अन् माझ्या वाटा आता वेगळ्या आहेत. आजपर्यंत ज्या भाजपविरोधात आपण लढलो त्यांच्यासोबत मी कधीही जाऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हीच सांगा काय मार्ग काय काढायचा?’ असा प्रतिप्रश्न करून पवारांनी गप्प केल्याचे बैठकीतील एका आमदाराने सांगितले.

