मुंबई-अजित पवार यांच्यासह त्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या 30 आमदारांनी आज पुन्हा शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर चर्चांना उधाण सुरू आहे. त्यावर प्रफुल्ल पटेल यांनी भेटीचे कारण देखील स्पष्ट केले होते. त्यानंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची भूमिका माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली.
शरद पवार हे युपीएचा भाग आहेत. त्यामुळे बंगळुरू येथे आयोजित बैठकीला उद्या जातील, असा मला विश्वास आहे. त्यांनी त्यांची भूमिका अगदी स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोणतेही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे काम नाही. विरोधकांच्या बैठकीला का गेले नाही. या प्रश्नावर जयंत पाटील यांनी उत्तर दिले.
ज्या लोकांनी पवार साहेबांसोबत अनेक वर्षे काम केले. ते लोक येऊन भेटत असेल तर त्यात गैर काहीच नाही. काही लोकांनी पक्षविरोधी कृती केली आहे. त्यामुळे या ओढावलेल्या परिस्थितीतून मार्ग काढावा, अशी आग्रहाची विनंती अजित दादांसह अन्य सहकाऱ्यांनी पवार साहेबांकडे केली आहे. परंतू शरद पवार साहेबांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे कोणतेही कारण नाही. त्यांची भूमिका अगदी स्पष्ट आहे. असे प्रतिपादन जयंत पाटील यांनी केले.
जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, आपल्या घरात कोणी आले तर विश्लेषणात्मक टिप्पणी करणे योग्य नाही. ते शरद पवारांना भेटायला आले तेव्हा ते कसे दिसत होते, ते नाराज होते का. याच्याशी काहीही संबंध नाही. पवार साहेबांनी आपली भूमिका येवल्याला जाऊन अगदी स्पष्ट केली आहे. त्यामुळे प्रत्येक भेटीनंतर शरद पवारांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे, असे मला अजिबात वाटत नाही.जी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यातून मार्ग दाखवावा, अशी मागणी अजित पवारांसह मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या लोकांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे. शरद पवार साहेबांना कोणीही कधीही भेटू शकते. त्यामुळे कोणी भेटायला आले तर त्यांना साहेब नाकारत नाही, असे जयंत पाटील म्हणाले.जयंत पाटील म्हणाले की, काही लोक संवाद साधण्यासाठी येत असतील तर राजकारणात तो संवाद चालू ठेवावा लागतो. जे लोक त्यांच्यासोबत वर्षानुवर्षे काम करत आहेत, त्यांना भेटण्याचा मार्गदर्शन घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे राजकारणात संवाद कायम ठेवावा लागत असतो, तो कायम चालूच राहणार आहे.

