येवला -अजित पवाराच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर शरद पवार यांची शनिवारी नाशिकच्या येवल्यात जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी अजित पवारांसोबत पक्षाशी बंडखोरी करणाऱ्या छगन भुजबळ यांच्यावर तिखट हल्ला चढवला. तसेच आगामी निवडणुकीत त्यांना पराभूत करण्याचे मतदारांना आवाहन केले. येवला हा भुजबळांचा विधानसभा मतदार संघ असल्यामुळे पवारांच्या येथील सभेला महत्त्व प्राप्त झाले आहे.
यावेळी शरद पवार म्हणाले, १०-१२ दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक भाषण केलं. या भाषणात त्यांनी नेहमीप्रमाणे काँग्रेसवर हल्लाबोल केला. वेगवेगळे आरोप केले. हे करत असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही आरोप केले. त्यांनी त्यांच्या भाषणात एक-दोन उदाहरणं सांगितली. भ्रष्टाचाराचे आरोप केले. मी आज राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून सांगतो, त्यांनी जे काही आरोप केले असतील, त्यात भ्रष्टाचाराचे आरोप असतील किंवा आणखी काही असेल, त्यावर त्यांनी कारवाई करावी.
शरद पवार म्हणाले, माझं देशाच्या पंतप्रधानांना जाहीरपणे सांगणं आहे की, संपूर्ण देशाची सत्ता त्यांच्या हातात आहे. ती त्यांनी लावावी आणि आमच्यापैकी कोणी जर भ्रष्टाचारात सहभागी आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर तुमची असेल नसेल ती सगळी सत्ता वापरा, चौकशी करा, तपास करा आणि जो चुकीच्या रस्त्यावर गेलाय असं तुम्हाला वाटेल किंवा तुमचा तसा निष्कर्ष निघेल त्याला हवी ती शिक्षा द्या. त्यासाठी तुम्हाला आमचा पाठिंबा असेल.
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, माझा छगन भुजबळांविषयची अंदाज चुकला. यासाठी मी तुमची माफी मागण्यास आलोय, असे त्यांनी मतदारांना उद्देशून म्हटले. तर त्यांनी विविध विषयाला हात लावत जुन्या जाणत्या नेत्यांची आठवण करत नाशिककरांनी मला जोरदार साथ दिली आहे. असे सांगितले. संकटाच्या काळात येथील जनता पुन्हा राष्ट्रवादीच्या पाठिशी उभी राहिल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गडी काय अजून पाहिलाच नाही?
व्यक्तिगत बोलणे कधीच थांबत नसते. वय झाले ते खरे आहे पण गडी काय आहे अजून पाहिला कुठे, असे सांगत त्यांनी बंडखोरांना इशारा दिला. त्यामुळे उगं वयाबियाच्या भानगडीत पडू नका, वय आणि व्यक्तीगत भावना आम्हाला कोणी शिकवू नये. व्यक्तिगत हल्ले कधी अजिबात झालेले नाही. ते त्यांनी करू देखील नाही. या जनतेच्या विश्वासाला ज्या पद्धतीने तडा दिला. ते चुकीचे आहे.
एकीकडे बाप म्हणायचे दुसरीकडे घाव घालायचा- जितेंद्र आव्हाड
14 आमदार नाशिकरांनी दिली आहे. येवल्यांच्या बंधू बघिणींना सांगतो की, गोपिनाथ मुंडें यांचे मोठे भाऊ पंडीतराव मुंडे हे शरद पवार साहेबांकडे तीनदा गेले आहेत. त्यांनी पवार साहेबांना तीनदा विनंती केली आहे. आम्हाला तुमच्याबरोबर यायचे आहे. तेव्हा त्यांनी नकार दिला. आज भुजबळ बोलतात की, गोपिनाथ मुंडे यांचे घर फोडले? या आरोपाला काहीही अर्थ नाही. तेव्हा पवार साहेबांनी गोपिनाथ मुंडे यांना फोन करून सांगितले आहे. आम्ही दुसऱ्या मार्गाने निघाले आहोत. महाराष्ट्राचे स्वभावामध्ये विठ्ठलावर तलवार चालविणे, एकीकडे बाप म्हणायचे दुसरीकडे घाव घालायचा. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हणाले.
गोदावरी काठचा पवित्र जिल्हा निवडला. तुमचा कांदा, द्राक्षावर संकट आले तेव्हा हा माणूस उभा राहिला. भुजबळ देखील 75 वर्षांचे आहात. वय हे अंक आहे. हे समजून घ्या. त्यांना पंतप्रधान ना, ना राष्ट्रपती व्हायचा आहे. आता त्यांना दलित, शोषित एकच नाव आहे. त्या व्यक्तीचे नाव आहे. शरद पवार. आपला बापाला आधार म्हणून उभे राहायचे आहे. त्यांच्या पाठिशी उभे राहायचे आहे, असे आव्हान त्यांनी केले.
निती, अनितीची ही लढाई
अमोल कोल्हे म्हणाले की, कुरूक्षेत्रासारखी परिस्थिती सद्या राज्यात आहे. समोर रक्ताची माणसं आहे. तेव्हा लढाई रक्ताच्या नात्यांशी आहे. पण यात निती, अनितीची ही लढाई आहे. या लढाईत खडा कोणी टाकला तर तो शकुनी मामाने. अन् तो शकुनी मामाचा आकार कमळाच्या फूलासारखे आहे की, टरबूजासारखा. हे जनताच ठरवेल. आणि या शकूनी मामाला दूर करून आपल्याला पक्ष संघटन करत लढाई लढायची आहे.
अच्छे दिन दिसलेच नाही
अमोल कोल्हे यांनी पुढे बोलताना मोदी सरकारवर देखील निशाणा साधला. ते म्हणाले की, आता अच्छे दिन दिसलेच नाही. वारंवार पक्ष फोडले का जाताहेत. महागाई कमी झाली का? नोकरी मिळणार होती त्या मिळाल्या का? आज जेव्हा देशातील परिस्थिती बघा, सगळीकडे भाजपला हद्दपार करायला लोक लागले. तेव्हा अशाप्रकारे फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. पण मतदारांचा विश्वास उडाला आहे. कारण मतदारांना बोटावरील शाई ही चुना वाटायला लागली आहे.
त्यांना पांडुरंग समजला नाही
काही जण म्हणतात की, पांडुरंगाला बडव्यांनी घेरले. पण त्यांना पांडुरंग समजलाच समजलाच नाही. त्यामुळे अशा प्रकारचे आरोप त्यांच्याकडून करून संधीसाधूचा डाव साधला जात आहे. अशा लोकांना येत्या निवडणूकीत नक्कीच जागा दाखवायची आहे, असे आव्हान राष्ट्रवादीचे नेते तथा खासदार अमोल कोल्हे यांनी केला.
सुळे,कोल्हे, आव्हाड, रोहित पवारांचे शक्तिप्रदर्शन
येवल्यातील सभा संपल्यानंतर सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे रोहित पवार, जितेंद्र आव्हाड यांच्या रॅलीला नागरिकांनी जोरदार स्वागत केले. भुजबळांच्या येवल्यात राष्ट्रवादी पवार गटाकडून झालेल्या शक्तीप्रदर्शनाला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.

