पुणे-डीआरडीओ संशोधन आणि विकास विभाग संचालक डाॅ. प्रदीप कुरुलकर याने डीआरडीआेच्या आर अँड डीमधील विकसित केलेल्या प्रकल्पाबाबतची संवेदनशील माहिती पाकिस्तानी हेर झारादास गुप्ता हिला हस्तांतरित केल्याचे स्पष्ट झाले आहे. कुरुलकर याने झारादास गुप्तासोबत केलेले वेगवेगळे व्हाॅट्सअॅप चॅट तपास यंत्रणेस सापडले असून त्यात कुरुलकर याने ब्रह्मोस मिसाइल, अग्नी-६ मिसाइल, आकाश मिसाइल, अस्त्र क्षेपणास्त्र, ड्रोन प्रोजेक्ट, रुस्तम प्रोजेक्ट, क्वापटर, इंडियन निकुंज, पराशर, यूसीएव्ही, डीआरडीआे ड्यूटी चार्ट, मिसाइल लाँचर, मेटोर मिसात्तर्ल, एमबीडीए, राफेल आदींबाबत चर्चा करून त्यातील काही माहिती पुरवल्याचे दहशतवादविरोधी पथकाने न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात सांगण्यात आले आहे.
एटीएसतर्फे डाॅ कुरुलकरविरोधात १८३७ पानी दोषारोपपत्र विशेष न्यायाधीश व्ही.आर.कचरे यांच्या न्यायालयात तपास अधिकारी सुजाता तानवडे यांनी दाखल केले आहे. शुक्रवारी संबंधित दोषारोपपत्राची प्रत डाॅ.कुरुलकर याच्या व्हिडिआे काॅन्फरन्सिंगमधील न्यायाधीशांसमोरील संमतीने त्याचे वकील ऋषिकेश गानू यांना दिली आहे. कुरुलकरच्या न्यायालयीन कोठडीत २१ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. कुरुलकर याच्या पाॅलिग्राफ चाचणीसाठी पोलिसांचे लेखी म्हणणे सादर करण्यास न्यायालयाने सांगितलेले आहे.
डॉ. कुरुलकर याच्याविरोधात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दोषारोपपत्रात एकूण २०३ साक्षीदारांचे जबाब नोंद केल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये डीआरडीओचे पुणे व दिल्ली येथील डीआरडीओ आरअँडडीईमधील स्टाफ व काही अधिकाऱ्यांचे जबाब घेण्यात आले आहेत. दोषारोपपत्राबाबत दिल्लीतील गृह मंत्रालयाची मंजुरी, पत्रे, सर्व मूळ पंचनामे, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचा पत्रव्यवहार, आरअँडडीईसोबत केलेला पत्रव्यवहार, तपास अधिकारी यांचे १६८ प्रमाणे अहवाल व स्टेशन डायरी, डीआरडीआेकडून प्राप्त झालेला आरोपी कुरुलकर याचा इलेक्ट्रॉनिक गॅजेटचा अॅनालिसिस रिपोर्ट, आरोपी व वाँटेड आरोपी याच्या मोबाइलचा तांत्रिक विश्लेषण अहवाल तसेच सोशल मीडियाबाबतचा अहवाल सादर केला आहे.
माहितीच्या गैरवापराचा ठपका
डॉ. कुरुलकर डीओरडीओत १० जून २०२२ ते २४ फेब्रुवारी २०२३ यादरम्यान संचालक पदावर कार्यरत होता. त्याने विविध गोपनीय माहिती परदेशी हस्तकास पुरवली. संरक्षण खात्याशी संबंधित माहिती तसेच भारताची सार्वभौमता, एकात्मता व परकीय देशांशी मैत्रीपूर्ण संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता असूनही तसेच देशाच्या सुरक्षिततेस बाधा येण्याची शक्यता असताना परकीय हस्तकांच्या फायद्यासाठी देशाच्या सुरक्षेस बाधक ठरेल, अशा पद्धतीने पदाचा गैरवापर केल्याचा ठपका कुरुलकरवर ठेवण्यात आला आहे.
हेर म्हणायची “बेब’
पाकिस्तानी हेर झारादास गुप्ता ही कुरुलकर याला ‘बेब’ नावाने बोलत होती. त्याच्या मोबाइलमध्ये तिने व्हिडिओ क्लिप पाठवण्यासाठी क्लाऊड चॅट, बिंगचॅट हे अॅप डाऊनलोड करण्यास लावले. तसेच तिने एक लिंक पाठवून त्यावर तिचा मेलआयडी, पासवर्ड टाकून ते अॅपदेखील त्याच्या मोबाइलवर इन्स्टाॅल करण्यास सांगितले. त्या माध्यमातून अग्नी-६ वापराबाबत माहिती दिली गेली. ‘मेंटॉर’ मिसाइलपेक्षा ‘अस्त्र मिसाइल’ जास्त अचूक लक्ष्य करते हेदेखील कुरुलकरने सांगितले.

