एकूण ३६३.५ किलो वजन उचलून शर्वरी ठरल्या स्ट्रॉंग वुमन ऑफ एशिया- पॅसिफिक- आफ्रिकन रीजन
पुणे : आशियाई पॅसिफिक आफ्रिकन पॉवरलिफ्टिंग आणि बेंच प्रेस स्पर्धेत पुण्याच्या डॉक्टर शर्वरी इनामदार यांनी दुहेरी यश संपादन केले. त्यांनी नवीन ‘आशियाई स्क्वॉट रेकॉर्ड’ व नवीन ‘आशियाई टोटल रेकॉर्ड’ सह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. क्लासिक बेंच प्रेस स्पर्धेमध्ये सुवर्णपदकासह ‘बेस्ट लिफ्टर ऑफ एशिया- पॅसिफिक- आफ्रिकन रिजन’ हा “स्ट्रॉंग वुमन” एशिया- पॅसिफिक- आफ्रिका म्हटला जाणारा मानाचा किताबही पटकावला
क्वीन एलिझाबेथ स्टेडियम, हॉंग कॉंग येथे स्पर्धा पार पडल्या. एशिया, पॅसिफिक व आफ्रिकन अशा तीन खंडातील ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, मंगोलिया, श्रीलंका, चायना, चायनीज ताईपै, हॉंगकॉंग, जपान, साऊथ आफ्रिका, कझाकिस्तान, इराण, इराक, सिंगापूर फिलिपिन्स आदी १८ देश या स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते.
डॉ. शर्वरी इनामदार यांनी ५७ किलो महिला गटात क्लासिक पाॅवरलिफ्टिंग मध्ये एकूण ३६३.५ किलो वजन उचलले. चुरशीच्या स्पर्धेत विजयश्री खेचून आणली. त्या पुणे येथे ‘कोड ब्रेकर’ नावाची जिम व ‘आहार आयुर्वेद’ हे क्लिनिक चालवतात. परिश्रम, सातत्य चिकाटी, घरच्यांचे व आप्तस्वकीयांचे पाठबळ या गोष्टी स्पर्धा खेळण्यासाठी, जिंकण्यासाठी प्रोत्साहित करतात, असे डॉ. इनामदार त्यांनी सांगितले.

