मुंबई: शरद पवार यांना कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर लोकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून अजित पवारांच्या शपथविधीवेळी सह्या करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रचंड धास्तावले आहेत. लोकनेता असलेल्या शरद पवारांना कराडमध्ये लोकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. ही गर्दी पाहून राष्ट्रवादीच्या आमदारांना भीती वाटू लागली आहे. शरद पवार मतदारसंघात विरोधात उभे ठाकल्यास काय होईल, ही चिंता शपथविधीला उपस्थित असणाऱ्या आमदारांना सतावत असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी केले. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.याशिवाय, अजित पवार यांच्या समर्थकांकडून बॅनर्सवर शरद पवार यांचा फोटो वापरला जात असल्याबद्दलही आव्हाड यांनी टिप्पणी केली. अजित पवार यांनी विकासासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली पुढे जाण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे आता अजित पवार यांच्या समर्थकांनी बॅनर्सवर नरेंद्र मोदी आणि त्यांच्या गटाचे राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल यांचा फोटो लावावा, असे आव्हाड यांनी म्हटले.अजित पवार हे सोमवारी दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेऊन आपली पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सकाळी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले. खातेवाटप निश्चिती करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात चर्चा सुरु असल्याचे समजते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४२ आमदारांचं समर्थन असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शरद पवारांना मिळणारा पाठींबा पाहून बंडखोर धास्तावले
Date:

