महाराष्ट्रातून शरद पवारांना प्रचंड मोठा पाठींबा , साताऱ्यात तुडुंब गर्दी …
सातारा : राष्ट्रवादीत झालेल्या ऐतिहासिक बंडखोरीनंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं. यावेळी जमलेल्या समर्थकांना संबोधित करताना पवार यांनी राजकीय लढाईचं रणशिंग फुंकलं आहे. ‘महाराष्ट्रातील सामान्य माणूस राज्यात राजकीय उलथापालथ घडवणाऱ्या प्रवृत्तींना त्यांची योग्य जागा दाखवून देईल,’ असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे.
प्रीतीसंगम या यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळावरून बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘राज्याराज्यांतील सरकारे उलधून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे फक्त महाराष्ट्रातच नाही तर मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेशमध्येही सुरू आहे. चुकीच्या प्रवृत्ती डोकं वर काढत आहेत. याच प्रवृत्तींनी छत्रपती शिवरायांच्या, शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रातही हा प्रकार सुरू केला आहे. लोकशाही पद्धतीने काम करणाऱ्या पक्षाला धक्का देण्याचा हा प्रयत्न आहे. देशात यांना जातीय हिंसा वाढवायची आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ घडवून आणण्यात आली आहे. याच प्रवृत्तींना तुमच्या आमच्यातील काही सहकारी बळी पडले आहेत. पण ठीक आहे, एखादा व्यक्ती बळी पडला असेल, मात्र या महाराष्ट्रातील सामान्य माणूस एकवेळ उपाशी राहील, परंतु तो या महाराष्ट्राची सामूहिक शक्ती मजबूत केल्याशिवाय आणि या शक्तीतून महाराष्ट्रात उलथापालथ घडवणाऱ्यांना त्यांची योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. या गोष्टीला फार अवकाशही राहिलेला नाही. वर्ष-सहा महिन्यांमध्ये निवडणुकांतून ही जागा दाखवली जाईल,’ अशा शब्दांत शरद पवार यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर हल्लाबोल केला आहे.’यशवंतराव चव्हाणसाहेब आज नसले तरी त्यांनी दिलेला विचार तुमच्या माझ्या अंत:करणात आहे. हा विचार पुढे नेण्याची भूमिका आपल्या सगळ्यांना घ्यायची आहे. महाराष्ट्रात आणि देशात आज माणसा-माणसांमध्ये संघर्ष निर्माण करण्याची काळजी सत्ताधाऱ्यांकडून घेतली जात आहे. महाराष्ट्र हे बंधुत्वाचा पुरस्कार करणारं राज्य आहे. मात्र याच महाराष्ट्रात शाहू महाराजांचं कोल्हापूर असो किंवा नांदेड, संगमनेर, अकोला यांसारख्या शहरांमध्ये एकमेकांमध्ये वैर निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. या शहरांमध्ये जातीय दंगली झाल्या आणि हे महाराष्ट्राला शोभणारं नाही,’ असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.

