मुंबई भाजपा अध्यक्ष आ ॲड. आशिष शेलार
मुंबई: दिनांक ३० जून २०२३
शरद पवार यांचे स्टेटमेंट म्हणजे गुगली वगैरे काही नाही ती गाजराची पुंगी आहे. वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली असे आहे, अशी टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी आज पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर केली.
ते पुढे म्हणाले की, पवारांची ती पुंगी शिवसेनेबरोबर वाजेल की, आमच्याबरोबर येऊन वाजेल यासाठी वाजवलेली आहे. जिथे वाजली तिथे वाजवली. नाही वाजली तिथे खावून टाकली. याला आम्ही गुगली वगैरे मानत नाही. ही सत्तेची वखवख आहे. सत्तेसाठी काय पण हा उद्योगधंदा म्हणजे शरद पवारांची त्या काळातील वेगवेगळ्या पक्षांशी केलेली चर्चा आहे. या विषयावर देवेंद्रजीं बोलल्यानंतर अर्धसत्य बाहेर आलं. या विषयावर जाहीर चर्चेला आम्ही तयार आहोत. संपूर्ण सत्य समोर येईल. या गाजराच्या पुंगी वाजवण्यात त्रिफळाचीत कोण झाला असेल तर तो उद्धवजी यांचा पक्ष आहे. ते अजूनही भुल दिल्यासारखे आहेत. शरद पवारांच्या या गाजारांच्या पुंगीमुळे उद्धवजींचा पक्ष, नाव, सत्ता, हिंदुत्व, वंदनीय बाळासाहेबांचे विचार गेले. ‘कहीपर निगाहे कही पर निशाना’ यामुळे उद्धवजी यांचा पक्ष संपला. एकनाथ शिंदे यांनी केलेला उठाव किती योग्य होता हे शरद पवार यांच्यामुळे आज कळले. मा. एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी पहिल्या दिवसापासून हेच उध्दव ठाकरे यांना सांगत होते की, राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याला संपवायला चालले आहे. ते आपल्याशी डबल गेम खेळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसवर भरोसा ठेवू नका. ते कधी बदलतील सांगता येत नाही असे सांगत होते. आज शरद पवार साहेबांनी स्पष्ट केले आहे की, ते आमच्याशी बोलायला तयार झाले. बोलत होते; बोलले… याचा अर्थ ते शिवसेनेची प्रामाणिक नव्हते. पहिल्याही दिवशी नव्हते आजही नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी केलेला उठाव हा किती योग्य आणि त्याला वैचारिक अधिष्ठान होते याचे पुरावे शरद पवार साहेबांनी आज दिले असे आ. ॲड. आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत यांना चेहऱ्यावर थुंकी उडवून घ्यायची सवय
संजय राऊत यांनी उडवलेली खिल्ली स्वपक्षाला आणि महाराष्ट्राच्या जनतेला अपमानित करणारी आहे. त्यांनी शिंदे- फडणवीस सरकारची उडवलेली खिल्ली याचा अर्थ ते महाराष्ट्रातील जनतेला मूर्ख समजतात काय? असा प्रश्न जनतेच्या मनात आहे. जनतेचा कौल भाजपा- शिवसेनेला होता. जनतेच्या मनातील सरकार स्थापन झाले. त्याची खिल्ली उडवणे म्हणजे जनतेला मूर्ख समजून स्वतःचा टेंबा मिरवणे असे आहे. स्वतःचा टेंबा त्यांनी कितीही मिरवला तरी कोंबडा आरवायचा थांबणार नाही. सूर्य उगवायचा थांबणार नाही. सूर्यावर थुंकणारे स्वतःच्या चेहऱ्यावर थुंकी उडवून घेतील. संजय राऊत यांना स्वतःच्या चेहऱ्यावर थुंकी उडवून घ्यायची सवय आहे हे काही नवीन नाही अशी टीका आ. ॲड. आशिष शेलार यांनी केली.

