मुंबई-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर डबल गेम केल्याचा आरोप केल्यानंतर भाजपच्या आणखी एका बड्या नेत्याने पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. फडणवीस यांनी सांगितलेले 100 टक्के खरे आहे. भाजप – राष्ट्रवादीची आघाडी फायनल झाली होती. शरद पवारांनी पालकमंत्री व जिल्हेही ठरवले होते असे या नेत्याने म्हटले आहे.शरद पवारांनी आम्हाला धोका दिला यात तथ्य आहे असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमचा डबल गेम केला. त्यांच्या पुढाकारानेच राष्ट्रवादी व भाजपची महाराष्ट्रात सत्ता येणार होती. पण ऐनवेळी 4 दिवस अगोदर पवारांनी माघार घेतली. त्यामुळे पुढच्या गोष्टी जमल्या नाही, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. त्यानंतर आता राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, शरद पवारांनी आम्हाला धोका दिला यात तथ्य आहे. भाजप व राष्ट्रवादीची युती फायनल झाली होती. पवारांनी पालकमंत्री व जिल्हेही वाटप केले होते. त्यानंतर त्यांनी माघार घेतली. देवेंद्र फडणवीस जे काही म्हणाले ते 100 टक्के खरे आहे. पवारांचा राजकीय इतिहास पाहता याची पुष्टीही होते.
मुनंगटीवारांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. उद्धव काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत जातील असे आमच्या मनातही आले नव्हते. कारण आम्ही एकत्र लढलो होतो. पक्षाने मोठ्या मनाने त्यांना जागाही दिल्या. आम्ही आमच्या पक्षातून त्यांना उमेदवार दिला होता. साताऱ्यातील भाजपचा उमेदवार हा शिवसेनेचा म्हणून जाहीर केला. कोणत्याही राजकीय पक्षात असे होत नाही. पण आम्ही ते केले, असे मुनगंटीवार म्हणाले.
शिवसेना-भाजप आघाडीचा पुढील मुख्यमंत्री कोण? यावरून सध्या खमंग चर्चा रंगली आहे. देवेंद्र फडणीस यांनी हा निर्णय भाजप संसदीय मंडळाचा असल्याचे म्हटले आहे. मुनगंटीवारांनीही त्याला दुजोरा दिला आहे. हे स्वाभाविकच आहे. हे शिंदेना जरी विचारले तरी ते हेच सांगतील. पक्ष श्रेष्ठीच निर्णय घेतात, असे ते म्हणाले.

