मुंबई-अजित पवारांनी माझ्यासोबत शपथ घेतली होती. त्यामागे शरद पवार होते, असे विधान फडणवीसांनी केले. त्यावर शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले. देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना सगळं ठाऊक होतं आणि त्यांनी डबल गेम केल्याचं म्हटलं आहे. याविषयी शरद पवारांना विचारलं असता मी डबलगेम केला असं ते म्हणत असतील तर ते यात का फसले? अगोदर मी पाठींबा दिला आणि नंतर जर मी २ दिवसात भूमिका बदलली होती तर ते माहिती असतानाही त्यांनी २ दिवसानंतर पहाटेचोरून शपथ का घेतली ?असा प्रतिसवाल केला आहे.
“पहाटेच्या शपथविधीच्या आधी आमची बैठक शरद पवारांसह झाली. त्यानंतर दोन ते चार दिवसांनी शरद पवारांनी भूमिका बदलली असं फडणवीस म्हणाले. २०१४ चा विषय तुम्हाला आठवतोय का? त्यावेळी निवडणूक झाल्यानंतर मी सांगितलं होतं की बाहेरुन पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. नंतर द्यायची वेळ आली नाही. आम्हाला काही फडणवीसांचं कौतुक नव्हतं. पण त्यांच्यात आणि त्यांच्या मित्रामध्ये(शिवसेना) कसं अंतर पडेल यासाठी आम्ही ते केलं. त्यानंतरच्या काळात जे सांगितलं की भेट झाली ती गोष्ट खरी आहे. त्यानंतर ते स्वतःच म्हणाले की दोन दिवसात शरद पवारांनी भूमिका बदलली.”“जर दोन दिवसांमध्ये मी भूमिका बदलली तर देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांनी शपथ का घेतली? काय कारण होतं? शपथविधी चोरुन घेतली पहाटे? जर फडणवीसांना खात्री होती पाठिंबा आहे तर हे करायची आवश्यकता नव्हती. पहाटेचा शपथविधी घेतल्यानंतर जर आमचा पाठिंबा होता म्हणतात तर दोन दिवसांपेक्षा जास्त काळ सरकार राहिलं का? दोन दिवसांत त्यांची सत्ता गेली. याचा स्वच्छ अर्थ हा आहे की सत्तेसाठी आम्ही कुठेही जाऊ शकतो ही जी त्यांची पावलं होती ती पावलं समाजासमोर यावीत यासाठी काही गोष्टी आम्ही केल्या.”
आम्ही फसवलं तुम्ही का फसलात?
“आम्ही फसवलं असं आता फडणवीस म्हणत आहेत माझा प्रश्न आहे फसले का? उद्या मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला गव्हर्नर करतो, या शपथ घ्यायला तर लगेच शपथ घ्यायला याल का? मोदींचा यात काही संबंध नाही. सत्तेशिवाय करमत नव्हते ते राज्यातले नेते होते. भेट झाली होती. मी याआधीही सांगितलं. आजही भेटलो होतो त्याचा अर्थ असा होत नाही की अशा काही गोष्टी असतात. सत्तेशिवाय त्यांची अस्वस्थता होती ती लोकांसमोर आणली. आमच्या चर्चा सगळ्या झाल्या. काही करुन त्यांना आमची मदत हवीच होती. त्यामुळे चर्चा झाल्याशिवाय गोष्टी घडतात का?”
गुगली बॉलवर विकेट दिली तर काढायची नाही का?
“मी दोन ते तीन दिवसात माघार घेतली होती असं ते म्हणत आहेत तर त्यांनी शपथ का घेतली?” हा शरद पवारांचा डाव होता असा अर्थ काढायचा का? असं विचारल्यावर पवार म्हणाले, “तुम्हाला जो काही अर्थ काढायचा आहे तो काढा. हा डाव होता की नाही मला माहित नाही. माझे एक सासरे होते, त्यांचं नाव सदू शिंदे. ते गुगली बॉलर होते. त्यांनी अनेक मोठ्या मोठ्या प्लेअर्सच्या विकेट घेतल्या होत्या. मी क्रिकेट खेळलो नव्हतो तरीही गुगली कसा टाकायचा मला माहित होतं. त्यांनी विकेट दिली तर विकेट घेतलीच पाहिजे. अजित पवारांना नामुष्की सहन करावी लागली असं फडणवीस म्हणाले असतील पण त्यांची विकेट गेली हे सांगत आहेत. देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे लोक सत्तेसाठी किती पुढे जाऊ शकतात हे दाखवून दिलं. “
राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर
शरद पवार म्हणाले की, राज्यात पुणे, ठाणे, सोलापूर या सारख्या शहरात एकूण 2458 महिला, मुली बेपत्ता आहेत. हा आकडा गेल्या सहा महिन्यातील आहे. तसेच बुलढाणा, वाशिम, अमरावती, रायगड, अमरावती, जळगाव, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया य अशा पोलिस अधीक्षक ग्रामीण अंतर्गत येणाऱ्या 14 जिल्ह्यामध्ये 23 जानेवारी ते 23 मे या काळात 4,431 मुली महिला बेपत्ता झाल्या आहेत. तर गेल्या 2022-23 मे अखेर या दीड वर्षांच्या काळात एकंदरीत 6,989 मुली बेपत्ता आहेत. त्यांना शोधणार कधी, राज्याच्या गृहमंत्र्यांनी या बघिणींच्या सुरक्षेसाठी व बेपत्ता झाल्यांचा शोघ घेऊन याची खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. अन्य विधाने करण्यापेक्षा त्यांनी महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे म्हणत त्यांनी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला.
समान नागरी कायद्याला शिख धर्मीयांचा विरोध
देशाच्या पंतप्रधानांनी काही गोष्टी सांगितल्या. समान नागरी कायदा, त्याचे म्हणणे आहे की, देशात दोन वेगवेगळे मत कसे असू शकतात. केंद्र सरकारने लॉ कमिशन यांच्याकडे हा विषय सोपवला. नऊशे प्रस्ताव आलेले आहेत. या प्रस्तावात काय म्हटले ह्याची माहिती मला नाही. किंवा लॉ कमिशनने देखील तसे मांडले नाही. ज्याअर्थी ही जबाबदार संस्था काम करते, प्रस्ताव मागते, त्यांच्यात काय तरी असावे. पण संस्था उघडपणे काही माहित देत नाही. दुसरीकडे समान नागरी कायदा मध्ये शिख, ख्रिश्चन, जैन यांचे काय होणार आहे. यात शिख समाजातील लोकांचे वेगळे मत आहे, अशी माहिती समोर आले आहे. त्यामुळे त्यांचा विचार केलाशिवाय निर्णय घेणे योग्य ठरणार नाही.

