पुणे-
पुणे-सोलापूर महामार्गावर एका भरधाव इंधनवाहू टँकरने महिला दुचाकीस्वारला धडक दिल्याची घटना बुधवारी सकाळी कुंजीरवाडी येथे घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू झाला असून सहप्रवासी शाळकरी मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या अपघातानंतर पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक काहीवेळ विस्कळीत झाली होती.
योगिता राजकुमार गव्हाणे (वय- 35, रा. होले काॅम्प्लेक्स, ऊरळी कांचन, पुणे-सोलापूर रस्ता) असे मयत झालेल्या दुचाकीस्वार महिलेचे नाव आहे. या अपघातात सुरेखा राजकुमार गव्हाणे (वय- 16) ही मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मयत योगिता गव्हाणे या बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घरातून कामाला निघाल्या होत्या. पुणे-सोलापूर महामार्गावर कुंजीरवाडी जवळून त्या जात असताना अचानक भरधाव इंधनवाहू टँकरने दुचाकीला भरधाव वेगात धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार योगिता आणि त्यांची मुलगी सुरेखा गंभीर जखमी झाल्या आणि मोठा रक्तस्त्राव होऊन त्या कोसळल्या. स्थानिकांनी दोघींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच योगिता गव्हाणे यांचा मृत्यू झाला होता असे डॉक्टरंनी सांगितले.तर मुलीवर अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले.सदर अपघातानंतर पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर पोलिसांनी पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरळीत केली आहे. योगिता गव्हाणे यांचा अचानक अपघाती मृत्यू झाल्याने उरळी कांचन परिसरात शोककळा पसरली.

