मुंबई- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (२८ जून) मुंबईत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत या बैठकीत चर्चा होईल. राष्ट्रवादीकडून ४८ मधील जास्तीत जास्त मतदारसंघांवर दावा करून ठाकरे गटावर दबाव टाकण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निवासस्थानी दुपारी ही बैठक होणार आहे. तिन्ही पक्षांचे नेते या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेसने चंद्रपूरची एक जागा जिंकली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ तर शिवसेनेचे १८ खासदार आहेत. मात्र, शिवसेनेच्या अनेक खासदारांनी आता उद्धव ठाकरेंची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हाती घेतले आहे. त्या जागांवर काँग्रेस व राष्ट्रवादीचा डोळा आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांची मंगळवारी मुंबईत बैठक झाली. यापूर्वी झालेल्या चर्चेनुसार या पक्षाने २० लोकसभा मतदारसंघावर दावा केला होता, त्याचा पुनरुच्चार ज्येष्ठ नेत्यांनी केला. हीच मागणी मविआच्या बैठकीत जोर देऊन रेटून नेण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, चंद्रकांत हांडोरे, बसवराज पाटील, प्रणिती शिंदे उपस्थित होते. वज्रमूठ सभांना अजून वेळ लागणार असल्याचे या नेत्यांनी मान्य केले.
वांद्रे येथील बीकेसी क्लबमध्ये काँग्रेसची बैठक झाली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, आजच्या बैठकीत आम्हाला अनुकूल अशा २० मतदारसंघावर चर्चा झाली. अजून पूर्ण चर्चा झालेली नाही. आमची पुढील बैठक ६ जुलैला आहे. त्यामध्ये काँग्रेस दावा करणाऱ्या मतदारासंघाची नावे निश्चित केली जातील.

