पुणे-‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’च्या (डीईएस) ‘बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी) नव्याने उभारण्यात आलेल्या ‘मुकुंददास लोहिया शैक्षणिक संकुला’चे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
राज्याचे उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांतदादा पाटील, ‘डीईएस’च्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष डॉ. रविंद्र आचार्य, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, उद्योजक पुरुषोत्तम लोहिया यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
येत्या गुरुवारी (29 जून) सायंकाळी 7 वाजता ‘बीएमसीसी’च्या ‘टाटा सभागृहा’त हा कार्यक्रम होणार आहे. ही माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जगदीश लांजेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.
‘मुकुंद भवन ट्रस्ट’चे कार्यकारी विश्वस्त व बीएमसीसीचे माजी विद्यार्थी पुरुषोत्तम लोहिया यांनी त्यांचे वडील मुकुंददास लोहिया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिलेल्या देणगीतून संकुलाची निर्मिती करण्यात आली आहे.
संकुलाचे एकूण बांधकाम साठ हजार चौरस फूट इतके आहे. पंधराशे विद्यार्थी वापरू शकतील अशा 20 वर्गखोल्या, 250 विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, प्राचार्य कक्ष, प्राध्यापक कक्ष, प्रशासकीय कार्यालय, स्वतंत्र वाहनतळ अशा सुविधा पाच मजली संकुलात उपलब्ध करून दिल्या आहेत. संगणक प्रयोगशाळेसाठी नारायण राठी यांनी आर्थिक मदत केली आहे.
‘बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडिज इन ई कॉमर्स ऑपरेशन्स’ (बीएमएस), ‘बी. व्होक फिल्म मेकिंग ॲण्ड ड्रॉमेटिक्स’, ‘बी. कॉम फिनटेक’, ‘बी. कॉम ऑनर्स’ हे बीएमसीसी स्वायत्त महाविद्यालयाने नव्याने सुरू केलेले अभ्यासक्रम या संकुलात शिकविण्यात येणार आहेत.
‘भरतसृष्टी प्रकल्प’
चित्रपट आणि नाट्यनिर्मितीचे शास्त्रशुद्ध आणि व्यावसायिक पदवी शिक्षण देण्याच्या उद्देशाने पाचव्या मजल्यावर पंधरा हजार चौरस फूट जागेत ‘भरतसृष्टी’ प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे.
‘भरतसृष्टी’ची वैशिष्टये
ध्वनिमुद्रण स्टुडिओ : स्वरलता
ध्वनी संस्करण आणि नियंत्रण कक्ष : स्वरांकन
आभासी विश्व निर्मितीसाठी स्टुडिओ : विश्वदर्शन
संगीत रंगभूमीची परंपरा चालविणाऱ्या गंधर्व मंडळी आणि दादासाहेब तोरणे यांचे नात जपण्यासाठी : सरस्वती सिनेटोन
विद्यार्थ्यांना चित्रपट सृष्टीचा वसा देणारी : दादासाहेब फाळके आणि ग. दि. मा. दालन
‘अयोध्येचा राजा’ या पहिल्या मराठी बोलपटाशी नाते जपणारे प्रेक्षागृह
गुरूदत्त, राजा परांजपे, राजदत्त आणि राज कपूर अशा दिग्गज दिग्दर्शकांशी नाते जोडणारा : गुरूराज कक्ष
भरतसृष्टीच्या निर्मितीत दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, ध्वनी निर्देशक निखिल लांजेकर, सुजय भडकमकर यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले आहे.

