रस्ता तर कराच पण गुन्हेगारांना तातडीने अटक करा ..
पुणे- बारामती येथे एका शासकीय कार्यालयासमोर रस्त्याच्या कामाच्या मागणीसाठी आत्मदहन केलेल्या चर्मकार समाजाच्या रोहिदास माने या कार्यकर्त्याचा रुग्णालयातील २० दिवसांच्या झुंजीनंतर काल मृत्यू झाला .यामुळे संतप्त झालेल्या चर्मकार महासंघाच्या कार्यकर्त्यांनी काल पासून ससून शवागारातून रोहिदास माने यांचा मृतदेह स्वीकारण्यास नकार देऊन रस्ता तर कराच पण गुन्हेगारांना तातडीने अटक करा अन्यथा मृतदेह घेणार नाही, अंत्यसंस्कार तोवर करणार नाही अशी भूमिका घेतल्याने शासनापुढे पेच निर्माण झाला आहे.
यासंदर्भात राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष संतोष कृष्णा टोणपे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कावळे,आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल सातपुते यांनी सांगितले कि, आम्ही या संदर्भात ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना पत्रही दिले आहे . यात असे म्हटले आहे की,
गाव रेडा, ता. इंदापूर येथील रहिवासी श्री. रोहिदास माने, वय अंदाजे ४० वर्षे, यांनी चर्मकार वसाहतीमधील २० कुटुंब व पुढे इतर समाज वापरत असलेला जुना शंभर वर्षे वहिवाट असलेला रस्ता खडी, मुरूम टाकून स्वः खर्चाने दुरुस्ती करण्यासाठी गेली ३ ते ४ वर्षे प्रांत, तहसील व इतर अनेक ठिकाणी विनंती अर्ज करत होते. या कामात शेजारील पवार नावाची तोतया पत्रकार असलेली व्यक्ती गावातील काही लोकांची मदत घेऊन अडचणी आणत होती. यासाठी अनेक वेळा पोलीसांत तक्रार सुध्दा झाली होती.
मागील महिन्यात आपले काही चर्मकार बांधवांसोबत रोहिदास माने हे सदर रस्ता लवकर व्हावा यासाठी आमरण उपोषणाला प्रांत कार्यालय, बारामती येथे बसले असता प्रांत यांनी पोलीस अधिकारी यांना पोलीस संरक्षण देऊन दोन दिवसात रस्त्याचे काम पूर्ण करून सहकार्य करण्याचे आदेश दिले. या आदेशाला संबंधित पोलीस अधिकारी यांनी केराची टोपली दाखविली. यामुळे रोहिदास माने यांनी पुन्हा आमरण उपोषणाचा मार्ग स्विकारला व आत्मदहनाचा इशारा देऊन उपोषणाच्या पाचव्या दिवशी महसूल प्रशासनाच्या व पोलीस प्रशासनाच्या निष्काळजी पणाच्या विरोधात स्वतःला पेटवून घेतले. यामध्ये ते ४० त ५०% भाजले. त्यांना उपचारासाठी पुणे येथे सुर्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रांत तहसील साहेबांनी स्वतः भेट देऊन त्यांच्या उपचाराचा खर्च सरकार करेल असे सांगितले होते. परंतु चार दिवसांनी खर्च बंद केला. यामुळे उपचारात निष्काळजीपणा होत गेला आणि १५ दिवसांनी, काल दि. २४ जून २०२३ रोजी सकाळी ११ वाजता रोहिदास माने यांचा मृत्यू झाला. पुणे पोलीसांनी पोस्टमार्टम करण्यासाठी रोहिदास माने यांचा मृतदेह ससून शवागारात आणून ठेवला आहे.
या मृत्यूस पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन व नेहमी रस्त्यास विरोध करणारा शेजारी पवार व इतर काही सवर्ण लोक कारणीभूत आहेत. सदर व्यक्तींवर गुन्हा दाखल करून घ्यावा व सदरचा रस्ता सरकारी नोंद करुन त्वरीत दुरुस्ती व्हावी अशी मागणी करण्यात आली असून या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत रोहिदास यांचा मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही अशी भूमिका माने कुटुंबाच्या वतीने घेण्यात आली आहे.आजही मागसवर्गीय समाजावर अन्याय होत आहेत. पोलीस अधिकारी आरोपी यांना साधी अटकही करू शकत नाहीत, महसूल प्रशासन ठीम्म आहे. कोणतीही कारवाई करण्यात येत नाही.


