एमआयटी डब्ल्यूपीयूत बोध रामकथेचा ग्रंथ प्रकाशित
पुणे, २३ जूनः भगवान श्री राम यांनी विश्व शांतीचा आदर्श ठेवलेला आहे. एक व्यक्ती कसा असावा, आदर्श पुत्र, पिता, पती आणि भाऊ कसा असावा हे रामाच्या जीवनाकडे पाहिल्यावर कळते. राम केवळ राजा नाही तर ते मर्यादा पुरूषोत्तम व्यक्तीमत्व आहे. असे विचार पूज्य श्री राघवेंद्र स्वामी मठ मंत्रालयाचे पीठधिपती श्री श्री १००८ पूज्य श्री सुबुधेंद्रतीर्थ स्वामी यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात भागवताचार्य ह.भ.प. बाळासाहेब बडवे यांच्या लेखणीतून उतरलेल्या बोध राम कथेच्या या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वामी बोलत होते.
यावेळी उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हास पवार व माजी आमदार प्रशांत परिचारक व लेखक शहाजीराव बळवंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड होते. तसेच कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, डॉ. संजय उपाध्ये व अनिरूद्ध बडवे उपस्थित होते.
विश्वशांतीसाठी अहोरात्र कार्य करणारे विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या विशेष सत्कार श्री श्री १००८ पूज्य श्री सुबुधेंद्रतीर्थ स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला.
श्री श्री १००८ पूज्य श्री सुबुधेंद्रतीर्थ स्वामी म्हणाले, रामाचे संपूर्ण व्यक्तीत्व हे शांती स्वरूप आहे. त्यामुळेच रामाला संपूर्ण विश्वामध्ये आदर्श व मर्यादा पुरूषोत्तम व्यक्ती मानले जाते. रामाच्या व्यक्तीत्वामुळेच रामायण देशातील सर्व भाषांमध्ये काळानुसार अनुवादीत झाला आहे.
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, बोध रामकथेचा ग्रंथ समाजाला नक्कीच दिशा दर्शक ठरणार आहे. लेखकांनी ज्या पद्धतीने विचार मांडले आहे ते वर्तमानकाळा नुसार आहे. संपूर्ण व्यक्तीमत्व कसे आदर्श असते हे रामाच्या संपूर्ण जीवन चरित्रावरून दिसते.
उल्हास पवार म्हणाले, समाज व्यवस्था बदलली पण मानवी मनाचे गुढ रहस्य आज ही रामायणात सापडते. रामाच्या जीवन शैलीत व तत्वज्ञानत मानवी जीवन समाविष्ठ आहे. मानवी मनाचे विविध पैलू, स्वभाव, गुण दोष, कुटुंब, नाते या सर्व गोष्टी म्हणजेच रामायण आहे.
लेखक बाळासाहेब बडवे यांनी ग्रंथाच्या माध्यमातून रामायणाचे अनेक पैलू सद्यस्थितीतील घटनांच्या अनुषंगाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. राम कथेतील अनेक सूक्ष्म निरीक्षण नोंदवत असताना त्यामधून नैतिक आचरण आणि रामभक्तीचा आदर्श नव्याने उभा करण्याचा प्रयत्न केला आहे.
शहाजीराव बळवंत म्हणाले, रामायणातील तत्व जे मांडले गेले त्या तत्वांचे पालन समाज करीत नाही. रामायण हे कुटुंबासाठी आहे. यात भाऊ, पत्नी, वडील यांच्या बरोबर कसे नाते असावे हे दर्शविले आहे. त्यामुळे वर्तमान काळात या ग्रंथांची आवश्यकता आहे.
यावेळी डॉ. संजय उपाध्ये व वारकरी दत्तात्रय गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
अनिरूद्ध बडवे यांनी प्रास्ताविक केले.
प्रा. अतुल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

