BRS मध्ये प्रवेश
पुणे: लोकप्रिय नृत्यांगना सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत BRS पक्षात प्रवेश केला आहे.
सुरेखा पुणेकर यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या धुमधडाक्यात प्रवेश केला होता. आता दोन दिवसांपूर्वीच त्यांनी हैदराबाद येथील भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केला आहे. यापूर्वी प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. आता सुरेखा यांनीही पक्ष सोडत थेट हैदराबाद येथील BRS पक्षात प्रवेश केला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत सुरेखा पुणेकर यांनी गुरूवारी (ता. २२ जून) पक्षप्रवेश केला
सुरेखा यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळेच त्यांनी बीआरएसमध्ये पक्षप्रवेश केल्याचे सांगितले जात आहे. त्या मोहोळ किंवा देगूलूर या दोन मतदारसंघातून बीआरएसच्या तिकिटावर लढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सुरेखा पुणेकर या ‘बिग बॉस मराठी’ मध्ये सहभागी झाल्या होत्या. बिग बॉसमुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या. यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयाने महाराष्ट्राच्या राजकारणात किती फरक पडणार हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.

