मुंबई–
मुंबई महापालिकेच्या कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी आज सलग दुसऱ्या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुंबईत छापेमारी केली. ईडीच्या पथकाने आज आज सकाळी मुंबई महापालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी हरीश राठोड आणि तत्कालीन उपायुक्त रमाकांत बिरादार यांच्या निवासस्थानी धाड मारली.उद्धव ठाकरे यांना मुंबईत कोडींत पकडण्यासाठीच या कारवाया केल्या जात असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.
दरम्यान, काल ठाकरेंचे निकटवर्तीय असलेल्या कंत्राटदारांसह तत्कालीन अधिकाऱ्यांच्या ठिकाणांवरही ईडीने छापे टाकले. यात आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण, खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर, संजय शहा, नितीन गुरव यांच्यासह मुंबई मनपाचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त व आताचे म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वाल यांच्याशी संबंधित 15 ठिकाणांची झडती घेण्यात आली. सूरज चव्हाण यांच्या घरातून ईडीचे पथक तर रात्री दीड वाजतात बाहेर पडले. सकाळी आठवाजेच्या सुमारास ईडीचे पथक सूरज चव्हाण यांच्या घरी धडकले होते. त्यामुळे कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी ईडीच्या तपासाने आता वेग घेतल्याचे दिसत असून ईडी आणखी काही पालिका अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ईडीचे अधिकारी सध्या महापालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी हरीश राठोड आणि तत्कालीन उपायुक्त रमाकांत बिरादार या दोन्ही अधिकाऱ्यांची विचारपूस करत असल्याची माहिती आहे. दोघांच्याही घरात कसून चौकशी केली जात असून प्रत्येक कागदपत्रांची छाननी केली जात आहे. तसेच, या दोन्ही अधिकाऱ्यांच्या घराबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कुणालाही घरात येऊ दिले जात नाहीये.
कोरोना काळात ठाकरे सरकारने दिलेल्या कंत्राटांची ईडी सध्या कसून चौकशी करत आहे. त्यामुळे कंत्राट मिळालेले कंत्राटदार व तत्कालीन पालिका अधिकारी ईडीच्या रडारवर आले आहेत. त्यानुसारच आज आणखी पालिकेच्या दोन अधिकाऱ्यांच्या घरी ईडीने धाड टाकली आहे. कोविड कंत्राट पुरवण्याच्या प्रक्रियेत या पालिका अधिकाऱ्यांचाही सहभाग होता.
भाजपने उद्धवसेनेवर कोविडकाळात मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला. त्याला पलटवार म्हणून आदित्य ठाकरे यांनी प्रशासक काळात या मनपातील 9 हजार कोटींच्या ठेवी मोडून उधळपट्टी केल्याचा आरोप केला होता. त्याविरोधात 1 जुलै रोजी माेर्चा काढून शक्तिप्रदर्शन करण्याची त्यांची रणनीती होती. मात्र त्यापूर्वीच दिल्लीतून सूत्रे हलली व ईडीने ठाकरेंच्या निकटवर्तीयांवर छापे टाकले. त्यातच आता राज्य सरकारनेही एसआयटीमार्फत मुंबई मनपातील तत्कालीन कोविड घोटाळ्याची चौकशी करण्याची घोषणा केली आहे. यातून केंद्र व राज्य सरकार उद्धवसेनेची चोहोबाजूने कोंडी करत आहे. या दबावतंत्राचा वापर करून ठाकरे गटाचे काही लोक शिंदे सेनेत खेचून घेण्याचीही त्यांची रणनीती आहे

