पुणे-दक्षिण पुण्यातील आंबेगाव परिसरात राहणाऱ्या एका 33 वर्षीय तरुणाला एका महिलेने स्वत: नग्न व्हिडिआे काॅल करुन संबंधित तरुण ते पाहत असल्याचे स्क्रीनशाॅट काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत पैशाची मागणी केली.
मात्र, त्यानंतर दिल्ली येथून एका ताेतया सायबर पोलिस अधिकाऱ्याचा फाेन येवून त्याने संबंधित फसवणुक करणाऱ्या महिलेचा शाेध घ्यावयाचे असल्याचे सांगत पैशाची मागणी करुन तरुणास सात लाख 14 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी अज्ञात पाच माेबाईल क्रमांक धारक आराेपी विराेधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदरचा प्रकार 9/2/2022 ते 14/5/2023 यादरम्यान घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणास प्रथम एका महिलेने स्वत: नग्न व्हिडिओ काॅल केला. सदरचा काॅल सुरू असतानाच तक्रारदार तरुण ते पाहत असल्याचे त्याचे स्क्रीनशाॅट महिलेने काढून संबंधित स्क्रीनशाॅट व व्हिडिओ त्याचे मित्रांना पाठवते अशी धमकी देत पैशाची मागणी केली. त्यानंतर एका अनाेळखी व्यक्तीने तरुणास फाेन करुन ‘मी दिल्ली सायबर आयुक्त श्रीवास्तव बाेलत आहे. सदर फसवणुक करणाऱ्या महिलेचा तपास करावयाचा आहे, असे सांगत पोलिसांना तपास करण्यासाठी पैशांची गरज असल्याचे सांगितले. त्याकरिता वेगवेगळी कारणे सांगून वेळाेवेळी एकूण सात लाख 14 हजार रुपये घेऊन त्यांची फसवणुक करण्यात आलेली आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलिस पुढील तपास करत आहे.

