पुणे : काम करण्यापूर्वी आम्हाला भेटला का नाही..? अशी विचारणा करत महापालिकेच्या ठेकेदाराला भाजपच्या महापालिकेतील एका पदाधिकाऱ्याने आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा प्रकार महापालिकेत चर्चिला जातो आहे . मात्र या तथाकथीत पदाधिकाऱ्याचे किंवा ठेकेदाराचे नाव कोणी स्पष्ट घेईनासे झाले आहे. यामुळेच , मारहाणीनंतर दुसऱ्याच दिवशी हे प्रकरण वाढू नये याची दक्षता घेण्यात आली असून या प्रकरणी पालिका प्रशासनावरही दबाव टाकला जात असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे,महापालिकेत गेली पाच वर्षे सत्तेत असलेल्या भाजपवर विरोधकांकडून भ्रष्टाचाराच्या करण्यात येत असलेल्या आरोपांचे असे प्रकार पुरावेच असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात रंगली आहे.
काही अधिकारी आणि कर्मचारी हे टार्गेट केले जात असून प्रशासकीय पातळीवर देखील त्यांना आधार मिळेनासा झाल्याचे यामुळे दिसून येते आहे. दक्षिण पुण्यात तर दादागिरी आणि दहशत निर्माण करून ठेवल्याचे सोशल मिडिया तून देखील स्पष्ट दिसत आहे. काही ठिकाणी फक्त भाजपच नाही तर अन्य काही राजकीय माजी लोकप्रतिनिधीं स्वतःच पण कार्यकर्त्यांचे नवे पुढे करून ठेकेदार बनलेले आहेत. आणि जिथे ते नाहीत अशा ठिकाणी अन्य ठेकेदारांना दहशतीला तोंड द्यावे लागत आहे. हे सर्व सर्वांना ठाऊक असले तरी पुढे यायला मात्र कोणी तयार होत नसल्याचे वारंवार दिसून आले आहे.
महापालिकेतील सत्ताधारी भाजपचा समान पाणी योजना हा महत्वांकांक्षी प्रकल्प असून तो आधीच उशीर झाल्याने महापालिका निवडणूकांमध्ये पक्षाला फटका बसेल म्हणून तो वेगाने पूर्ण करण्यासाठी भाजपकडून पाठपुरावा सुरू आहे. परिणामी, प्रशासनाकडून शहरभर खोदाईसाठी बंदी असतानाही समान पाणी योजनेसाठी पावसाळयातही जलवाहिन्या टाकण्यासाठी खोदाईस सहमती दिली आहे. त्यानुसार, जलवाहीनीचे काम मिळालेल्या कंपनीने एका सब कॉन्ट्रॅक्टरकडे हे काम दिले आहे. महापालिकेस सूचना देऊन मार्केटयार्ड परिसरात हा ठेकेदार खोदाई सुरू करण्यास गेला होता.
त्यावेळी महापालिकेतील एका माजी पदाधिकाऱ्याच्या कार्यकर्त्यांनी ठेकेदारास काम करण्यास मनाई केली. तसेच, आमच्या साहेबांना का भेटला नाही.. कामाची कल्पना का दिली नाही अशी विचारणा केली. मात्र, आता महापालिकेत नगरसेवक अस्तित्वात नसल्याने तसेच पदाधिकारीपदही नसल्याने या ठेकेदाराने “मी तुमच्या साहेबांना ओळखत नाही.. ” असे सांगत काम सुरूच ठेवले. त्यामुळे संतापलेल्या या पदाधिकाऱ्याने कार्यकर्त्यांसह ठेकेदाराला मारहाण केली. त्यानंतर हे प्रकारण आंगलट येण्याची शक्यता लक्षात घेऊन दुसऱ्या दिवशी हे प्रकरण मिटविण्यात आले आहे. मात्र, या प्रकरणाची चांगलीच चर्चा महापालिकेत रंगली असून, “या पूर्वी याच ठेकेदाराने साहेबांना भेटून काम होते तेव्हा या साहेबांनी या ठेकेदाराचे कौतुक केले होते. मात्र, अचानक काय झाले अशी चर्चा प्रशासकीय वर्तूळात रंगली आहे.

