मुंबई–
चित्रपट निर्मात्यांनी वादग्रस्त संवादाचा वाढता विरोध पाहता चित्रपटाचे संवाद बदलण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशीर यांनी रविवारी ट्विट करून चित्रपटाबाबत स्पष्टीकरण दिले आणि चित्रपटातील वादग्रस्त संवाद या आठवड्यात बदलले जातील असे सांगितले.तरीही मुंबईतील नालासोपारा येथे हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी संध्याकाळी चित्रपटाचा शो बंद पाडला. हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थिएटरमध्ये घोषणाबाजी करत प्रेक्षकांना बाहेर काढले. त्यानंतर शो रद्द करण्यात आला.
आदिपुरुष चित्रपटाबाबतचा वाद सुरूच असतानाच दुसरीकडे बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट रोज नवनवीन विक्रम रचत असल्याचे समोर येत आहे. पहिल्या दोन दिवशी वर्ल्डवाइड 140 कोटी आणि 100 कोटींची कमाई केल्यानंतर तिसऱ्या दिवशीही या चित्रपटाने 100 कोटींचे कलेक्शन केले आहे. त्यामुळे पहिल्या वीकेंडला 340 कोटींची वर्ल्डवाईड कमाई करत चित्रपटाने इतिहास रचला आहे.
छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये रविवारी संध्याकाळी हिंदूत्ववादी संघटनांनी रॅली काढली. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत मॉलमध्ये प्रवेश केला. पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी बॅरिकेडिंगही केले होते, मात्र ते तोडून कार्यकर्त्यांनी मॉलमध्ये प्रवेश केला. नंतर सभागृहासमोर बसून हनुमान चालिसाचे पठण केले. पोलिसांनी त्यांना अटक करून तिथून काढले.

